नगर जिल्ह्यातील तीनही राष्ट्रीय महामार्गांचे प्रश्न सोडविणार, मंत्री नितीन गडकरी यांच्या आश्वासनानंतर आमदार लंके यांचे उपोषण मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यातील तीनही राष्ट्रीय महामार्गांचे प्रश्न सोडवले जातील,  अशी ग्वाही केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले. त्यानंतर अजित पवार यांच्या हस्ते  सरबत प्राशन करून आमदार नीलेश लंके यांनी चार दिवसांपासून सुरू असलेले आपले बेमुदत उपोषण आंदोलन मागे घेतले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज आमदार नीलेश लंके यांची यावेळी भेट घेतली. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार, पंचायत समिती सभापती क्षितिज घुले, उपजिल्हाप्रमुख रफिक शेख, शिवशंकर राजळे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, ‘‘नगर जिह्यातील तीन राष्ट्रीय महामार्गांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार लंके यांनी उपोषण सुरू केले. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोनवरून बोलणे केले असून, या तिन्ही रस्त्यांची कामे तत्काळ मार्गी लावण्यासह त्याला निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही गडकरी यांनी दिली आहे. आठ दिवसांनंतर पुन्हा आढावा घेतो, असे गडकरी यांनी सांगितल्याचेही अजित पवार म्हणाले. शिवाय श्रीगोंद्याजवळच्या उड्डाणपुलाचे काम 28 फेब्रुवारीपर्यंत, तर नगर-पाथर्डी महामार्गाचे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण केले जाईल, असे लेखी आश्वासन अधिकाऱयांनी दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.’’ त्यामुळे आमदार लंके यांना उपोषण थांबविण्याची विनंती केली असून, त्यांनी त्याला मान्यता दिल्याचेही अजित पवार म्हणाले.

आमदार लंके म्हणाले, ‘‘चार दिवसांपासून तीन रस्त्यांच्या प्रश्नांसाठी माझ्याबरोबर आणि अनेकजण उपोषणाला बसले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आपण उपोषण थांबवत असल्याचे त्यांनी सांगितले.’’

सरकारमधील अनेकजण वाचाळवीर

नगर : सरकार आल्यापासून त्यांच्यातले अनेकजण वाचाळवीर झाले आहेत. राज्यपालांपासून सगळे सत्ताधारी काहीही बोलतात. महाराष्ट्राचे मंत्री काम करण्यासाठी झाले की अशी वक्तव्ये करण्यासाठी, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला.