
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर उमेदवारांचे भवितव्य नेहमीप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात सील होणार आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, त्याचे कंट्रोल युनिट आणि यंदा वापरण्यात येणारे व्हीव्हीपॅट यंत्रासह इतर सामग्री सील करण्यासाठी लाखेचा वापर करण्यात येतो. या वर्षी ही लाखच ‘लाख’मोलाची साथ देणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी 6 नग या प्रमाणे लाखेचे 6 लाख 81 हजार नग कांडय़ा लागणार आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लाख वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
लाख-मेणबत्तीची जोडगोळी
लाख वितळवून मतदान यंत्रे सीलबंद केली जातात. ती वितळवण्यासाठी मेणबत्त्यांचा वापर केला जातो. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लाख वितळवण्यासाठी सुमारे 4 लाख 55 हजार मेणबत्त्यांची मागणी राज्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. कागद, पेन्सिल, खोडरबर, शाई इत्यादी साहित्यही मागवण्यात आले आहे.
छोटय़ा लाखेवर, मोठी जबाबदारी
जप्ती असो की, कागदपत्रे, पुरावे सीलबंद करायचे असो शासकीय कारवाईत छोटी लाख महत्त्वाची कामगिरी पार पाडते. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानानंतर मतदान यंत्रे आणि त्याच्याशी निगडीत साहित्य मतमोजणीपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे काम ही लाख करते. या आधीच्या निवडणुकांमध्ये कागदी मतपत्रिकेद्वारे मतदान होत होते. त्यावेळी मतपेटय़ा आणि इतर साहित्य सीलबंद केली जात असत. त्याऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे लाखेने सीलबंद केले जाणार आहेत.

























































