
>> प्रा. विजया पंडित
महापूर, चक्रीवादळे, अतिवृष्टी, ढगफुटी, भूकंप यांसारख्या वाढत्या नैसर्गिक आपत्तींमुळे आज वैश्विक समुदाय चिंताक्रांत झाला आहे. गतवर्षी तुर्कस्तान या देशाला विनाशकारी भूकंपाचा तडाखा बसल्याचे जगाने पाहिले; आता आफ्रिकेतील मोरोक्कोमध्ये झालेल्या भूकंपाने 2800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ‘जी-20’ परिषदेत मोरोक्कोला सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे आश्वासन भारतासह सर्वच देशांनी दिले. असा आत्मविश्वास मिळाल्याने तुटलेले धैर्य पुन्हा जिवंत होते, पण वाढत्या आपत्ती या पुनः पुन्हा मानवाला ‘‘निसर्गासोबत जगा’ असा इशारा देत आहेत. विकासवेडा मानव हा आक्रोश कधी ऐकणार?
निसर्गाच्या प्रकोपाविषयीच्या कहाण्या आपण पूर्वी हॉलीवूडपटातून पहायचो. निसर्गाच्या रौद्ररूपाची, तांडवाची भयावह दृश्ये पाहताना अशा प्रकारच्या आपत्तींच्या बातम्यांना समाज सरावून जाईल अशी कल्पना कधी कोणी केली नव्हती, पण जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांच्या काळात निसर्गाचा कहर हा जवळपास नित्याचा झाला आहे. निसर्गाच्या रुद्रावताराच्या काळात प्रगतीच्या उच्चांकाकडे निघालेला मर्त्य मानव काहीही करू शकत नाही. चंद्र आणि इतर अनेक ग्रहांना स्पर्श करणारे विज्ञानदेखील नैसर्गिक आपत्तींपुढे थिटे पडताना दिसते. गेल्या काही वर्षांपासून भूकंप, सुनामी, महापूर, चक्रीवादळे, ढगफुटी, अतिवृष्टी, भेदक दुष्काळ यांसारख्या आपत्तींचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींशी लढण्याची मानवाची ताकद आणि क्षमताच संपते की काय, अशी भीती वाटू लागली आहे. मंगळ, चंद्र, सूर्य, शुक्र अशा ग्रहमालेतील अनेक ग्रहांवर जाण्याच्या प्रयत्नांत असणाऱया शास्त्रज्ञांना अद्यापही भूकंप कधी आणि कुठे होणार, याचे नेमके उत्तर देता आलेले नाही. त्यामुळे अशा आपत्तींमुळे होत असलेली जिवित व वित्तहानी अव्याहत सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी मोरोक्को या आफ्रिकन देशामध्ये झालेल्या प्रलयकारी भूकंपात 2800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू माराकेश या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळापासून 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या ऍटलास पर्वताजवळील डोघिल नावाच्या गावात असल्याचे सांगितले जाते. 7.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे काही क्षणांतच इमारती कोसळल्या. गेल्या 120 वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप म्हणून ताज्या भूकंपाचे वर्णन केले जात आहे. 19 वर्षांपूर्वी मोरोक्कोमध्ये भूकंपाने असाच हाहाकार माजवला होता. 2004 च्या भूकंपात 628 लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हा परिस्थिती इतकी बिकट होती की, लोकांना रस्त्यावर उतरून निदर्शने करावी लागली होती. कारण त्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नव्हती. भूकंपाची खोली जमिनीपासून 18.5 किलोमीटर होती. पोर्तुगाल आणि अल्जेरियापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. यापूर्वी 1960 मध्ये अगादीरजवळ 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. तेव्हा हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. शहराच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोक या भूकंपात मारले गेले होते. प्रचंड हादरा नसतानाही बहुतेक इमारती कोसळून पडल्या होत्या. याला 20 व्या शतकातील सर्वात विनाशकारी ‘मध्यम’ भूकंप (सहापेक्षा कमी तीव्रता) असे म्हटले जाते. यंदाच्या वर्षी तुर्कस्तानात झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल इतकी होती. साहजिकच त्या भूकंपात 21,600 लोकांचा मृत्यू झाला होता.
ऍटलास पर्वतातील प्रदेशात सामान्यतः टेक्टॉनिक प्लेट्सच्या किनारी असलेल्या इतर ठिकाणांपेक्षा कमी भूकंप होतात. गॅलिंडो झेलवा हे ऍटलास पर्वताच्या निर्मितीवर आणि प्रदेशाच्या भूगर्भशास्त्रावर संशोधन करत आहेत. त्यांच्या मते, पॅन्गिया खंडाच्या विभाजनादरम्यान ऍटलास पर्वताची निर्मिती झाली. या पर्वताची उंच शिखरे आणि खडकाळ उतार यावरून ही पर्वतराजी सतत वाढत असल्याचे दिसते. युरेशियन आणि आफ्रिकन प्लेट्स एकमेकांच्या जवळ जात असल्यामुळे ऍटलास पर्वत दरवर्षी सुमारे एक मिलिमीटर वेगाने सरकत आहे. उत्तर आफ्रिका मध्यम भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय आहे. आफ्रिकन आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सच्या सततच्या टकरींमुळे या भागात अनेकदा हादरे बसतात.
मोरोक्को हा मोठा इतिहास असणारा देश आहे. उत्तर आफ्रिकेत अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्राजवळ असणाऱया या देशाला अल्जेरिया, स्पेन आणि पश्चिम सहारा यांनी वेढलेले आहे. जगाच्या एका कोपऱयात वसलेला हा देश युरोपच्या जवळ आहे. 1912 मध्ये मोरोक्को-फ्रान्स कराराने फ्रान्स मोरोक्कोचा संरक्षक बनला. दुसऱया महायुद्धानंतर मोरोक्कोने स्वातंत्र्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आणि 1944 मध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी इस्टिकल किंवा इंडिपेंडन्स पार्टीची स्थापना करण्यात आली. 1953 मध्ये युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ स्टेटच्या आदेशानुसार लोकप्रिय सुलतान मोहम्मद पाचवा यांना फ्रान्सने निर्वासित केले होते. त्याची जागा मोहम्मद बेन अराफा यांनी घेतली, पण त्यामुळे मोरोक्कन लोकांनी स्वातंत्र्यासाठी आणखी दबाव आणला. 1955 मध्ये मोहम्मद पाचवा हा मोरोक्कोला परत येऊ शकला आणि 2 मार्च 1956 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले.
1956 मध्ये भारताने सर्वप्रथम मोरोक्कोला मान्यता दिली. तेव्हापासून दोघांमधील संबंध कायम आहेत. दोन्ही देश अलिप्ततावादी चळवळीचे सदस्य आहेत. मोरोक्को हा आफ्रिकन युनियन आणि अरब लीगसारख्या आंतरराष्ट्रीय गटांचा भाग आहे. अलीकडेच भारताच्या पुढाकाराने आफ्रिकन युनियनचा ‘जी-20’मध्ये समावेश करण्यात आला आहे. मोरोक्कोदेखील या महासंघाचा सदस्य आहे. मोरोक्को फुटबॉलसाठीही ओळखला जातो. मोरोक्कोने आपल्या सैन्यासाठी भारताकडून 92 ट्रक खरेदी केले आहेत. संकटकाळात मानवाच्या रक्षणासाठी पुढे येणे ही संपूर्ण जगाची जबाबदारी आहे. त्यामुळे ‘जी-20’ परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मोरोक्कोमधील भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त केला आणि या कठीण काळात जागतिक समुदाय मोरोक्कोच्या पाठीशी आहे आणि आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत असे अभिवचन दिले. नेपाळ, हैती किंवा तुर्कस्तानमधील भूकंप असो, भारताने तातडीने मदतीचा हात पुढे करून मानवतेचे कर्तव्य पार पाडले आहे.
वाढत्या आपत्ती या पुनः पुन्हा मानवाला ‘निसर्गासोबत जगा’ असा इशारा देत आहेत. विकासवेडा मानव हा आक्रोश कधी ऐकणार? वर्षानुवर्षे पर्यावरण परिषदा पार पडूनही जागतिक तापमानवाढ नियंत्रणात आणण्यात अद्यापही यश येत नाही. विकास प्रकल्पांसाठी होणाऱया बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाची अपरिमित हानी होत आहे. वातावरणातील कार्बनचे शोषण करणारे वृक्ष, वनस्पती नामशेष होत असल्याने तापमान वाढीबरोबरच जैव साखळी नष्ट होत चालली आहे. वाढत्या नैसर्गिक आपत्ती ही निसर्गाचे दोहन करून होणाऱया विकासाची फळे आहेत. हे लक्षात घेऊन भारत आज स्वच्छ ऊर्जा, जैव इंधन यांच्या माध्यमातून जगाला शाश्वत विकासाच्या वाटेवर जाण्याचा मार्ग दाखवत आहे.

























































