जुन्नरमध्ये लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

70 जण जखमी; चौघांची प्रकृती गंभीर

जुन्नर तालुक्यातील लेण्यांची माहिती आणि साफसफाई करण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर आग्या मोहोळातील मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 70 जण जखमी झाले. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. जुन्नर तालुक्यातील तुळजा लेणी समूहाजवळ आज दुपारी ही घटना घडली. गेल्या दोन वर्षांतील ही दुसरी घटना आहे.

जखमीपैकी चौघांची प्रकृती गंभीर झाली होती. मात्र जुन्नर ग्रामीण रुग्णालयात योग्य उपचार घेतल्यानंतर त्या रुग्णांना बरे वाटू लागले आहे. काही जणांना उपचार करून बरे वाटल्याने त्यांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती पर्यटकांसोबत व सहलीसोबत आलेले कार्यकर्ते सागर कांबळे यांनी दिली. जुन्नरमध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त लेण्या म्हणजेच 350 लेण्या असल्याने येथे नेहमी पर्यटक येत असतात. लेणी संवर्धक चळवळीच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील विविध लेण्यांची साफसफाई करण्यासाठी तेथे असलेली पुरातन माहिती व लेण्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी काही बौद्ध संघटनांचे सुमारे सव्वाशे कार्यकर्ते पदाधिकारी जुन्नरजवळील लेण्या पाहण्यासाठी आले होते.

दोन वर्षांतील दुसरा हल्ला

किल्ले शिवनेरीवर शिवजन्म स्थळाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर आग्या मोहोळातील माश्यांनी हल्ला केल्याची घटना मार्च 2022मध्ये घडली होती. या हल्ल्यात लहान मुलांसह 75 ते 80 जण जखमी झाले. आठ दिवसांपूर्वी अंबा-अंबिका लेणी परिसरातील मानमोडी डोंगरावर आलेल्या 30 शालेय विद्यार्थ्यांवरदेखील मधमाश्यांनी हल्ला केला होता.