पुण्यात दुचाकी चोरणाऱ्या सराईताला अटक, तब्बल 21 दुचाकी जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या सराईताला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने अटक केली. त्याच्याकडून 6 लाख 17 हजारांच्या 21 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीने सोलापूर परिसरात दुचाकींची विक्री केली होती. पथकाने त्याच्याकडून सर्व चोरलेली वाहने जप्त केली आहेत. सुरेश संभाजी वाघमारे (वय – 28, रा. सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. हडपसर परिसरातील वाहनचोरीचा समांतर तपास करीत असताना पोलीस नाईक शिवाजी जाधव आणि दत्तात्रय खरपुडे यांना दुचाकीचोराची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सुरेश वाघमारे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हडपसर, लोणीकाळभोर, लोणीकंद परिसरातून तब्बल 21 दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी नारायण शिरगांवकर, पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर, उपनिरीक्षक गुंगा जगताप, अशोक आटोळे, विनायक रामाणे, दत्तात्रय खरपुडे, गणेश लोखंडे, शिवाजी जाधव यांनी केली

5 ते 10 हजारांत दुचाकींची विक्री

आरोपी सुरेश सराईत वाहनचोर असून वाहनांची चोरी केल्यानंतर तो 5 ते 10 हजारांमध्ये दुचाकींची विक्री करीत होता. विशेषतः सोलापूर परिसरातील शेतकऱ्यांना अत्यल्प किंमतीत दुचाकी विक्री करीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या फरार साथीदाराचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांनी दिली.

”शहरात वाहनचोरीच्या पाश्र्वभूमीवर गुन्हे शाखेच्या विविध पथकांना दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने मागील आठवड्यापासून विविध पथकांनी 40 हून अधिक दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यातूनही आणखी माहिती मिळाली असून इतर गुन्ह्यांच्या उकलीची शक्यता आहे.”

रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा