तरूणीच्या आवाजाने पोलिसांनी धाव घेतली अन मित्राचा जीव वाचला, दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलीस पेट्रोलिंगदरम्यान तरूणीच्या ओरड्यामुळे चोरट्यांच्या लुटमारीत गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा जीव वाचण्यास मदत झाली आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये सराईत हल्लेखोरासह साथीदाराला अटक करीत त्यांच्याकडून 59 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

सचिन अर्जुन भिसे (25 ) आणि चेतन गणेश यलमेळी (वय 22 दोघेही रा. तळजाई माता वसाहत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शशिकांत बनसोडे असे गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे.

दत्तवाडी तपास पथक 22 नोव्हेंबरला संध्याकाळच्या सुमारास पर्वती टेकडी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना अचानकपणे तरूणीच्या ओरड्याचा आवाज येऊ लागला. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, हवालदार कुंदन शिंदे, नवनाथ भोसले, ज्ञानेश्वर शिंदे यांनी जंगल परिसरात धाव घेतली. त्यावेळी तरूण गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांनी तातडीने तरूणाला रूग्णालयात दाखल केले. तरूणीकडे चौकशीदरम्यान, दोघा चोरट्यांनी त्यांच्याकडील ऐवज चोरीचा प्रयत्न केला. त्यावेळी शशिकांतने विरोध केल्याचा राग आल्यामुळे चोरट्यांनी त्याच्यावर कोयत्याने वार करून मोबाइल, घड्याळ, सोन्याचे दागिन्यांचा ऐवज चोरून नेला.

घटनेचे गांभीर्य ओळखून दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन आणि पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या आदेशानुसार परिसरात नाकाबंदी करून पर्वती टेकडी हद्दीत चोरट्यांची शोधमोहिम सुरू केली. त्यावेळी सराईत गणेश पळत जाताना पोलिसांना दिसून आला. पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेत साथीदारालाही जेरबंद केले. ही कामगिरी उपायुक्त सुहेल शर्मा, एसीपी सुनिल पवार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरिक्षक विजय खोमणे, उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, हवालदार कुंदन शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, नवनाथ भोसले, प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, दयानंद तेलंगे-पाटील, पुरुषोत्तम गुन्ला, अमोल दबडे, अनिस तांबोळी, प्रमोद भोसले, किशोर वळे, अमित चिव्हे, प्रशांत शिंदे, सद्दाम शेख यांनी केली. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे करत आहेत.

पर्वती परिसरात फिरण्यासाठी आलेल्या तरूण-तरूणीला मारहाण करीत लुटमार करणाऱ्या सराईतासह दोघांना अटक केली आहे. दरम्यान, नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत पर्वती जंगल परिसरात भटकंती करू नये. संशयास्पद व्यक्ती, पाठलाग करणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्यावी.
अभय महाजन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दत्तवाडी पोलीस ठाणे