पुण्यातील सदर्न कमांडची 38 लाखांची फसवणूक, हैदराबादच्या दोघा ठेकेदारांवर गुन्हा दाखल

अन्नधान्य पुरविण्याचा ठेका घेताना बनावट नुतनीकरण ठेव पावती आणि फिड पुरवठा करावयाचे हप्ते पावत्या सादर करुन दोघा ठेकेदारांनी सदर्न कमांड हेडक्वार्टसच्या मिलटरी फार्मसची तब्बल 38 लाख 88 हजार 88 रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी हैद्राबाद येथील ठेकेदार धर्मा देवी (आंध्रा सेल्स कॉर्पोरेशन रा. हैदराबाद) आणि मनोज अगरवाल (बालाजी कॉर्पोरेशन रा. मलाकपेठ, हैदराबाद) यांच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कर्नल अविनाश शर्मा (वय – 50, रा. फार्म हाऊस मिलिटरी, सिकंदराबाद) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना पुण्यातील सदर्न कमांड मुख्यालयातील मिलटरी फार्मसमध्ये जून 2012, जुलै 2013 आणि जानेवारी 2014 मध्ये घडली आहे.

अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी सदर्न कमांडमधील मिलटरी फार्मस यांनी निविदा काढल्या होत्या. त्यामध्ये संबंधित दोघांनी भाग घेतला. दोन्ही फर्मनी 38 लाख 88 हजार 500 रुपयांची नुतनीकरण ठेव पावत्या व फिड पुरवठा करावयाचे हप्ते पावत्या सादर केला. त्यानुसार त्यांना अन्नधान्य पुरवठा करायचा ठेका मिळवित कामकाज सुरु केले.

दोन्ही फर्मनी दिलेल्या सुरक्षा ठेव पावत्यांची कर्नल शर्मा यांनी हैदराबाद येथील स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडे शहानिशा केली. तेव्हा बँकेने अशा प्रकारच्या पूर्वी नुतनीकरणाच्या कोणत्याही ठेवी न ठेवण्याबाबतची माहिती दिली. दोन्ही ठेकेदारांनी वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी बनावट पावत्या तयार करुन सदर्न कमांड कार्यालयात सादर केली आणि लष्कराची 38 लाख 88 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले.

दरम्यान, कोरोनामुळे तक्रार देण्यास उशीर झाल्याने फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या