गोदामातील सुरक्षारक्षकाचा खून करणार्‍या तिघांना अटक, गुन्हे शाखेकडून बिहारमधील त्रिकूट जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हडपसरमधील फुरसुंगी परिसरात असलेल्या कंपनीच्या गोदामातील सुरक्षारक्षकाच्या खूनाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखा यूनिट पाचच्या पथकाला यश आले असून तिघांना अटक करण्यात आली आहे. गोदामातील लोखंडी पाइप चोरण्यासाठी आलेल्या चोरट्यांनीच  सुरक्षारक्षकाचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तिघेही बिहार राज्यातील आहेत.

ध्रुवदेव राजेंद्र राय (24), पंकजकुमार सिकंदर राय (22), अजयकुमार लखदेवप्रसाद यादव (24, तिघे सध्या रा. धावडे वस्ती, भोसरी, मूळ रा. बिहार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, काशीनाथ कृष्णा महाजन (52, मूळ रा. जळगाव) असे खून झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. फुरसुंगी भागातील एका गोदामात महाजन सुरक्षारक्षक म्हणून काम पाहत होते. या गोदामात लोखंडी पाइप ठेवण्यात आले होते.

या गोडावूनमध्ये लोखंडी पाइप असून तेथे एकच सुरक्षारक्षक असल्याची माहिती सिकंदर याला होती. सिंकदर याने साथीदारांसह परिसराची रेकी केली. यानंतर मंगळवारी मध्यरात्री आरोपी राय, यादव गोदामाच्या आवारात चोरी करण्यासाठी आले. यावेळी सुरक्षारक्षक महाजन यांना बेदम मारहाण करुन त्यांचा खून केला. त्यांचा मोबाइल  एटीएम कार्ड, रोकड तसेच लोखंडी पाइप चोरुन आरोपी पसार झाले. महाजन मृतावस्थेत सापडल्यानंतर गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यात आला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार तिघा आरोपींना पकडण्यात आले. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अतुल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक चैताली गपाट, अंमलदार प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, अकबर शेख, दया शेगर, राजस शेख आदींनी ही कारवाई केली.