
पुणे शहरातील गुगलचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्यामुळे खळबळ उडाली होती. याप्रकरणी बॉम्ब नाशक पथकाने संपूर्ण कार्यालय आणि परिसराची तपासणी केली. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या पथकाने दूरध्वनी करणार्याला हैदराबाद येथून ताब्यात घेतले आहे. गुगलच्या कार्यालयात काम करणार्या कर्मचार्याच्या भावानेच मद्यधुंद अवस्थेत फोन केल्याचे निष्पन्न झाले.
मुंढवा परिसरात व्यावसायिक इमारतीमध्ये 11 व्या मजल्यावर गुगलचे कार्यालय आहे. मुंबईतील गुगलच्या कार्यालयात रविवारी रात्री मद्यधुंद तरूणाने फोन करून पुण्यातील गुगलच्या कार्यालयात बॉम्ब ठेवला असल्याचे सांगितले. त्यानंतर गुगल कार्यालयाने तातडीने ही माहिती मुंबई पोलिसांना कळविली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी पुणे पोलिसांना माहिती दिली. मुंढवा पोलीस, बॉम्बशोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) गुगलच्या कार्यालयात पोहोचले. तेथे कार्यालय, इमारत आणि परिसराची तपासणी केली असता, संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी तांत्रिक तपास करीत फोन करणार्याचा माग काढण्यास सुरुवात केली. तेव्हा दूरध्वनी हैद्राबाद परिसरातून करण्यात आल्याचे उघडकीस आले. हैदराबाद पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले. दूरध्वनी करणारा पुण्यात गुगल कार्यालयात काम करणार्या कर्मचार्याचा भाऊ आहे. त्याने मद्यधुंद अवस्थेत दूरध्वनी केल्याची कबुली दिली आहे.
































































