नगररचना सहसंचालकाच्या पत्नीला अटक, बनावट दस्ताऐवज बनवून केली फसवूणक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

भागीदाराच्या बनावट सह्या करुन बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्या पत्नी संगीता हनुमंत नाझीरकर (वय 45, रा. कोथरुड) यांच्यासह आठजणांना सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. संगीता नाझीरकर, दिलीप कास्टिया, चंद्रकांत गरड, रवींद्र जैन, समीर जैन, देवेश जैन, राजेंद्र ओसवाल, ऋषभ ओसवाल, अ‍ॅड. सय्यद इनामदार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संग्राम सोरटे यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संग्राम आणि संगीता ओमसाई डेव्हलपर्स फर्मचे भागीदार आहेत. त्यांनी धायरीतील जागा विकसनासाठी घेतली होती. त्यावेळी आर्थिंक फायदा होण्याच्या दृष्टीने संगीता यांनी संग्राम यांच्या संमतीशिवाय दस्ताऐवज तयार केला. त्यावर संग्राम यांच्या बनावट सह्या करुन करारनामा केला. त्यानंतर खोटा दस्ताऐवज तयार करुन अ‍ॅड. इनामदार यांनी संग्राम हजर नसतानाही नोंदवून घेतला. याप्रकरणी फसवणूक झाल्यानंतर संग्राम यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार नउ जणांना अटक करण्यात आल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश उमरे यांनी सांगितले.

बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा

राज्याच्या नगररचना सहसंचालकपदी कार्यरत असणारे हनुमंत नाझीरकर यांनी बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात यापुर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पदावर असताना नाझीरकर यांनी राज्यातील अनेक ठिकाणी मालमत्ता घेतल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात निष्पन्न झाले आहे.