पुण्यात दिवसा ढवळ्या तरुणाचा कोयत्याने वार करून खून

57

सामना प्रतिनिधी। पुणे

काही दिवसांपूर्वी सिंहगड रस्ता भागात दारू पिण्याच्या वादातून एकाचा खून केल्याची घटना ताजी असतानाच आता तर थेट वॉईन शॉपच्या दारातच एका तरूणाचा कोयत्याने सपासप वार करून दिवसा ढवळ्या खून करण्यात आला. वर्दळीच्या सिंहगड रस्त्यावर फनटाईम थिएटरच्या शेजारी असलेल्या दुकानात ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात दहशत निर्माण होऊन येथील दुकाने बंद करण्यात आली. रोहन रमेश साळवी ( 27) असे मृत तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी दाद्या उर्फ रोहित मोरे याच्यासह चौघांवर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फनटाईम थिएटरजवळील एका कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटमध्ये एकामेकाला लागून दोन बियर शॉपी आहेत. दुपारी चारच्या सुमारास रोहन साळवी बिअर घेण्यासाठी तेथे गेला होता. त्याचा पाठलाग करत चौघे दुकानजवळ आले. फुटपाथवर उभे राहून रोहन काय करत आहे हे पाहिले. त्यानंतर हे चौघेही या बेसमेंटमध्ये गेले आणि शर्टच्या आतमधून लपवून ठेवलेले कोयते बाहेर काढून बिअर शॉपीच्या दारातच त्याच्यावर जबरदस्त हल्ला चढवला. त्याच्या डोक्यावर व तोंडावर कोयत्याने सपासप वार केले. ही घटना बघून बिअर शॉपी व शेजारच्या दुकानातील नागरिकांनी तेथून पळ काढला. पटापट सर्व दुकाने बंद करण्यात आली. रस्त्यावरून जाणारे नागरिकही घाबरले.

रोहन रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर या चौघांनी तेथून फनटाईन थिएटरच्या दिशेने पळ काढला. सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रोहनच्या शेजारी बिअरची बाटली पडली होती. तेथील शाडो नेट अंगावर टाकून त्याचा मृतदेह झाकण्यात आला होता.

वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील म्हणाले, ३१ डिसेंबरला दारू पिताना रोहनचा पाय लागल्याने त्याची त्याची रोहित मोरेशी भांडण झाली होती. त्यात त्याचा शर्ट फाटला होता. यानंतर दोन ते तीन वेळा रोहन आणि रोहित यांच्यामध्ये किरकोळ भांडणे झाली होती. ती मिटविण्यात आली होती. रोहन हा रविवारी दुपारी बिअर घेण्यासाठी दुकानात आल्याची माहिती रोहितला मिळाली. त्यानंतर रोहित आणि त्याच्या साथिदारांनी येथे येऊन कोयत्याने वार करून रोहनचा खून केला. आरोपींची ओळख पटली असून, त्यांचा शोध सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या