
पुणे पोलीस दलात विशेष शाखेत कार्यरत असलेले सहायक पोलिस फौजदार धनंजय बारभाई यांना प्रंशसनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीपक कर्णिक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पोलीस दलातील सेवेच्या उत्कृष्ठ कामगीरी बाबत त्यांना सन 2013 मध्ये पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस पदक ‘सन्मानचिन्ह ‘ प्रदान करुन गौरव केला आहे. उत्कृष्ठ कामगीरीची दखल घेवून त्यांचे गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल भारत सरकारने 26 जानेवारीला राष्ट्रपतीचे पोलीस पदक जाहीर केले आहे.
सहायक फौजदार धनंजय छबनराव बारभाई मूळचे जेजुरीतील रहिवाशी असून 1990 साली ते पोलीस सेवेत रुजू झाले आहेत. त्यांनी शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, फरासखाना, सहकारनगर, स्वारगेट, दत्तवाडी, भारती विदयापीठ विशेष शाखेत काम केले आहे. त्याशिवाय परिमंडळ एक आणि परिमंडळ तीन, सहायक पोलीस आयुक्त कार्यालय वानवडी आणि स्वारगेटमध्ये काम बजावले आहे . सेवाकालावधी मध्ये त्यांनी 277 बक्षीसे मिळविले असून त्यामध्ये 63 हजार 414 रूपये रोख स्वरूपात मिळाली आहेत .
विविध गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास
बारभाई यांनी पोलीस दलात ३१ वर्ष सेवा केली असून २००३ मध्ये स्वारगेट परिसरात झालेल्या खूनाचा तपास आणि विश्रामबागमध्ये २०१८ साली घडलेल्या गुन्ह्याचा उत्कृष्ठ तपास केला आहे. सराईत गुन्हेगारांना अटक करुन त्यांनी तपास कामात मदत केली आहे. खून खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरीचोरी, घरफोडी, वाहनचोरी, फसवणुक एट्रासिटी, पोक्सोमधील गुन्हेगारांविरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र पाठविण्यात त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे.
उत्कृष्ठ कामगीरीची दखल घेवून गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाल्याचा मनोमन आनंद झाला आहे. पुणे पोलिस दलात काम करताना राष्ट्रपती पदक जाहीर होउन कामाची पावती मिळाल्याचे समाधान आहे. – धनंजय बारभाई, सहायक पोलीस फौजदार, विशेष शाखा पुणे

































































