पुणे पोलिसांकडून हात जोडून विनंती अन बेशिस्तांना लाठीप्रसादही! नाकाबंदीची कडकपणे अंमलबजावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात आज कडक मिनी लॉकडाउनची अमंलबजावणी करण्यात आली. ठिकठिकाणी नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी वाहनचालकांकडे विचारपूस करीत हात जोडून घराबाहेर न पडण्याची विनंतीही केल्याचे दिसून आले. त्याशिवाय विनाकारण भटकंती करणाऱ्यांनाही लाठीप्रसाद देउन दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यामुळे दुपारनंतर बहुतांश रस्ते आणि परिसर निमर्नुष्य झाले होते.

मिनी लॉकडाउनसाठी पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी, पेट्रोलिंग आणि चेकिंगला प्राधान्य दिले होते. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना फिरण्यास मनाई करण्यात आल्याचे दिसून आले. त्याशिवाय कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांची खात्री पटल्यानंतर त्यांना प्रवासासाठी परवानगी देण्यात येत होती.

महत्वाच्या चौकातील नाकाबंदीदरम्यान वाहनचालकांना पोलिसांनी मागितलेल्या कागदपत्रांची पुर्तता करावी लागत होती. त्याशिवाय रुग्णांना डबा पोहोच करणे, औषधोपचारासाठी इतर ठिकाणी जाणारे नागरिक, रुग्णसोबत प्रवास करणाऱ्यांना पोलिसांकडून सहकार्य केले जात होते. विनाकारण घराबाहेर पडल्यास संसर्गाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्यामुळे निमयांची कडकपणे अमंलबजावणी केली जात होती. नाकाबंदीदरम्यान आढळून आलेल्या काही बेशिस्तांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

शासनाच्या ब्रेक द चेन कोरोना रोखण्यासाठीच्या आवाहनाला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, अत्यावश्यक सेवेसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांकडे पोलिसांकडून ओळखपत्रांची विचारपूस केली जात होती. खात्री पटल्यानंतर संबंधितांना मार्गस्थ होण्यास परवानगी देण्यात आली. त्याशिवाय विनाकारण भटकंती आणि विनामास्क प्रवास करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पहिल्या दिवशीच्या मिनी लॉकडाउनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे.

तब्बल 6 हजारांवर पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर

मिनी लॉकडाउनची अमंलबजावणी करण्यासाठी शहरातील महत्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. त्यासाठी तब्बल 6 हजारांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्याशिवाय क्वीक रिस्पॉन्स टीम, एसआरपीएफ तुकडी, राज्य राखीव पोलीस बल, रिझर्व्ह पोलिसांची कुमक मुख्यालयात तयार ठेवण्यात आली होती.

शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील क्षेत्रात पेट्रोलिंगवर भर देण्यात आला होता. त्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह इतर अधिकाऱ्यांनी ड्युटीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. किरकोळ वादावादी वगळता मिनी लॉकडाउनचा पहिला दिवस शांततेत पार पडल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.

कोरोना नियंत्रणासाठी ब्रेक द चेन अंतर्गत मिनी लॉकडाउनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी घरातच बसण्यास प्राधान्य दिल्यामुळे रस्ते निमर्नुष्य असल्याचे दिसून आले आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता कोणीही रस्त्यावर आले नाही. दरम्यान, नाकाबंदीत पोलिसांकडून कडकपणे तपासणी करण्यात येत होती. प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कोरोना साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी रविवारीही घरातच बसून पोलिसांना सहकार्य करावे.
– डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त, पुणे