भरचौकात अधिकाऱ्यांकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
police

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावर ड्युटी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याने भर चौकात विनाकारण जबरदस्त मारहाण केली. याप्रकारामुळे नगर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. दरम्यान,या प्रकरणानंतर या वादावर पडदा टाकण्यासाठी अधिकारी वर्ग कर्मचाऱ्यांवर दबाव टाकल्याचे समजते. याचपार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही.

नगर ग्रामीण विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याला मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमाराला पोलीस कॉन्स्टेबल सर्जेपुरा येथील पोलीस मुख्यालयाच्या मेन गेटवर उभा राहिलेला दिसला. त्याच्याकडे बघत तू येथे का उभा राहिला , असे ते म्हणाले . त्यावर कॉन्स्टेबलने मी सहज उभा राहिलो आहे, असे सांगितले. त्याचाच राग येऊन सहज कशाला उभा राहिला, असे म्हणत पोलीस अधिकाऱ्याने पोलीस कर्मचाऱ्यास बेदम  मारहाण केली. तोपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यावेळी संबंधित कॉन्स्टेबलनी मी मोठया साहेबांच्या बंगल्यावर आहे, असे सांगितले. तरीही यांनी त्याला सोडले नाही व त्याला उलट जबरदस्त मारहाण करत राहिले. सदरचा प्रकार हा रस्त्यामध्ये चौकातच घडल्यामुळे याची चर्चा जोरदारपणे सुरू झाली.

त्यानंतर कॉन्स्टेबल जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावर तात्काळ दाखल झाला. त्याने घडलेली हकीकत की जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांना सांगितल्याचे बोलले जात आहे. तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा साहेबाच्या बंगल्यावर तातडीने दाखल झाले असल्याचे समजते. याच वेळेला या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल व कॉन्स्टेबलचे यांचे वडील तसेच त्याचा भाऊ तेथे आले.  पोलीस अधिक्षकांनी सर्व घटना समजून घेतली. याच वेळेला घडलेला प्रकार लक्षात घेता , हे प्रकरण वाढवून नये म्हणून अधिकारी वर्गाने संबंधित कॉन्स्टेबल व यांच्या वडिलांना समजावून समजून सांगण्याचा प्रयत्नही केला.

काल रात्री घडलेल्या प्रकारानंतर तोफखाना पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित कॉन्स्टेबल व त्याचे नातेवाईक व इतर पोलीस कर्मचारी जमा झाले होते. आम्हला फिर्याद दयायची आहे, गुन्हा दाखल करून घ्या. अशी मागणी संबधित पोलीस कर्मचारी व त्याचे नातेवाईक अधिकाऱ्याकडे करत होते. मात्र या प्रकरणी आज सकाळ पर्यत कोणताही गुन्हा तोफखाना पोलिसांनी दाखल करून घेतला नसल्याचे समजते.