लोणीकंद आणि लोणी काळभोर वाहतूक नियोजनासाठी कर्मचाऱ्यांचा ‘बुस्टर’; सहपोलीस आयुक्तांच्या बैठकीत निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीतील लोणीकंद आणि लोणी काळभोर पोलीस ठाणे आयुक्तालयात समाविष्ट झाल्यामुळे आता वाहतूकीच्या दृष्टीकोनातून प्लॅनिंग केले जात आहे. त्यामुळे दररोज वाहतूककोंडीच्या कचाट्यात सापडणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. दोन्ही पोलीस ठाण्यातंर्गत हद्दीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.

आयुक्तालयात गुरुवारी सहपोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव, देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्या उपस्थित विविध निर्णय घेण्यात आले आहेत. विशेषतः दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये अतिरिक्त कर्मचारी देण्यासंदर्भात नियोजन केले जात आहे. त्याशिवाय शहर आणि ग्रामीण भागातील तुलनात्मक गुन्ह्यांच्या विश्लेषणाचा आराखडा तयार करून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, वाघोली आणि सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात नागरीकरणाचा वेग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुणे शहराला लागून हा भाग असल्यामुळे दोन्ही पोलीस ठाण्यांचा समावेश आयुक्तालयात झाल्यामुळे पोलिसांवरील ताण वाढणार आहे.

पोलीस उपायुक्तांसह सहायक आयुक्तांची नजर
दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीतंर्गत घडणाऱ्या गुन्ह्यांवर नजर ठेवण्यासाठी संबंधित पोलीस उपायुक्तांना दररोज भेटी देण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्याशिवाय उपायुक्तांच्या अनुपस्थितीत सहायक पोलीस आयुक्त पोलीस ठाण्यांना भेटी देत दररोजच्या घडामोडींचा आढावा घेणार आहेत. वाहतूक कोंडी सुरळीत करणे, गुन्हेगारीला आळा घालणे, बीट मार्शलद्वारे पेट्रोलिंगवर भर देण्यासंदर्भात प्राधान्य देण्यात आले आहे.

दोन्ही पोलीस ठाण्यातंर्गत हद्दीतील वाहतूक सुधारण्यावर प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत असून अतिरिक्त कर्मचारी देत वाहतूककोंडीपासून नागरिकांची सुटका केली जाणार आहे. त्याशिवाय वेगवेगळे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.
-डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त, पुणे शहर

शासन आदेशानुसार लोणीकंद आणि लोणीकाळभोर पोलीस ठाण्यांचा समावेश आयुक्तालयात झाला आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यांचे रेकार्ड, मुद्देमाल, जमीन वर्ग करण्याची प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. त्याशिवाय वायरलेस सेटअपसंदर्भातही चर्चा करण्यात आली आहे.
– डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण