पुणे – रेकॉर्डवरील सराईतांकडून 9 कोयते जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोयत्याची गोणी भरून अंधारात लपून बसलेल्या एका सराईतला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून 9 कोयते जप्त करण्यात आले आहेत. अक्षय अप्पया कांबळे (वय 27, रा. गुलटेकडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

शहरात कोयता गँगचे वर्चस्व वाढत असून त्यांच्यावर कारवाईसाठी गुन्हे शाखेकडे शहरात गस्त वाढविण्यात आली आहे. यानुसार युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान संशयित गुन्हेगार अक्षय हा डायस प्लॉट येथील त्याच्या राहत्या घरासमोरील कॅनॉलच्या कडेला अंधारात हातामध्ये गोणी घेऊन बसल्याची माहिती पोलीस उपनिरिक्षक नितीन कांबळे यांना मिळाली. यानुसार पथकाने सापळा रचून अक्षय याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता गोणीमध्ये 9 कोयते मिळून आले. प्रतिस्पर्धी गुन्हेगाराकडून जीवाला धोका असल्याने त्याने स्व:संरक्षणार्थ कोयते जवळ बाळगल्याची कबुली दिली. चौकशीत त्याचा गुन्हेगारी उद्देश स्पष्ट झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे, युनिट दोनचे वरीष्ठ निरिक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक नितीन कांबळे, अंमलदार शंकर नेवसे, गजानन सोनुने, मोहसीन शेख, प्रमोद कोकणे, कादिर शेख, निखिल जाधव, समीर पटेल, नागनाथ राख यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.