पुण्यात दुचाकीस्वार चोरट्यांचा धूमाकूळ, दोन महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यांकडून महिलांना लक्ष्य करून दागिने लंपास केले जात आहेत. चोरट्यांनी धायरीतील बेनकर वस्ती आणि कोथरूड येथील शास्त्रीनगर परिसरातून जाणाऱ्या पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली आहे.

धायरीत राहणाऱ्या ज्येष्ठ महिला भाजीपाला खरेदी करण्यासाठी बेनकर वस्ती येथील शारदा निकेतन येथून पायी जात होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 45 हजार रूपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. याप्रकरणी गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे करीत आहेत.

कोथरूड येथील शास्त्रीनगरमध्ये राहणारी 64 वर्षीय ज्येष्ठ महिला रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांची 1 लाख 65 हजार रूपयांची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. ही घटना गुरूवारी दुपारी शास्त्रीनगर जिजामाता गार्डन समोर घडली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी करीत आहेत. सध्या गणेश उत्सव सुरू असून नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. अशातच सोनसाखळी चोर महिलांना लक्ष करून त्यांच्या सोनसाखळ्या चोरत असल्याने नागरिकांनी तसेच महिलांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.