संसारात लुडबूड, पुण्यात सुनेने सासूला बदडले…

सासूच्या धाकामुळे भल्याभल्या रागीट सुनांना सासरवासाला सामोरे जावे लागले आहे. नाते टिकविण्यासाठी अनेक महिलांनी मनस्ताप सहन करीत संसाराचा गाढा ओढत आहेत. मात्र, सध्याच्या काळात सुनांना सासवांची संसारातील लुडबूड अजिबात सहन होत नसल्याचे मारहाणीवरुन दिसून आले आहे. अशीच एक घटना विश्रांतवाडीत घडली असून संसारात लुडबूड केल्यामुळे सुनेने सासूला बदडले आहे. त्यामुळे सासूचा गुडघा फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणी सविता अविनाश शिंदे (वय 30, रा. विश्रांतवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सुनेचे नाव आहे. मालती दिगंबर शिंदे (वय 58) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडीतील राममंदीराशेजारी शिंदे कुटूंबिय राहायला आहे. त्यांचा मुलगा, सून, सासू-सासरा, नातवंडे असा परिवार आहे. किरकोळ कारणामुळे सून सविता आणि सासू मालती यांच्यात सातत्याने भांडणे होत होती. त्यामुळे सविताला सासूचा राग येत होता. सततचे टोमणे आणि किरकोळ कारणांवरुन त्यांच्यात वाद होत होते. त्याचा राग आल्यामुळे सविताने 18 सप्टेंबरला सासूला तुझ्यामुळे माझा संसार होत नाही. असे म्हणत लाथा-बुक्क्यांनी बदडण्यास सुरुवात केली. सुनेने अचानक हल्ला केल्यामुळे मालती खाली पडल्या. त्यामुळे त्यांच्या गुडघ्याला जखम झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती सुनेच्या मारहाणीत मालती यांचा गुडघा फ्रॅक्चर असल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी सविताविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या