वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहतुकीचे नियमभंग केलेले वाहनचालक, ते शहरातील कोणत्या ना कोणत्या सीसीटीव्हीद्वारे पकडले जात आहेत. त्यानुसार वाहतूक पोलिसांकडून दंड वसुलीचा दणका दिला जात आहे. वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा वेग वाढविला आहे.

सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंग, नो एंन्ट्री, विना हेल्मेट दुचाकीस्वार, विना सीटबेल्ट मोटारचालक, राँगसाईट चालवणाऱ्यांविरुद्ध सिग्नलवरील सीसीटीव्हीनुसार दंडात्मक बडगा उगारण्यात येत आहे. त्यानुसार मोबाईलवर दंडात्मक कारवाईचा संदेश पाठविला जात आहे. नियमभंग करणाऱ्या चालकांविरोधात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच इ-चलन यंत्राच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे.

त्यानंतर दंडाच्या रकमेची माहिती मोबाईलवर पाठवून ऑनलाईनसह कर्मचाऱ्यांकडील पॉस मशीनद्वारे दंड जमा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरम्यान, चालकांनी दंड नाही भरला तर नाकाबंदीदरम्यान संबंधिताकडून दंड वसूल केला जाणार आहे. वाहतूक नियम मोडल्याचा फोटो आणि दंडासह पावती मिळाल्यामुळे चालक नियम मोडला नसल्याचे सांगूच शकत नाही. त्यामुळे वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा वाहतूक विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार आहे.

नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने पुणे शहरात येणाऱ्यांची संख्या दिवेंसदिवस वाढत चालली आहे. त्यातच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे वैयक्तिक वाहन प्रवास करणाऱ्यांमध्ये भर पडत आहे. अरूंद रस्ते, बेशिस्तपणा, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघातांची मालिका कायम आहे. मात्र, अपघात झाल्यानंतर वाहतूक पोलिसांसह महापालिका प्रशासनाच्या नावाने बोंबाबोंब करणाऱ्यांकडून स्वंयशिस्तीला तिलाजंली दिली जात आहे. वाहतूक विभागाकडून वारंवार आवाहन करूनही विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, मोटार चालिवताना सीटबेल्टचा वापर न करणे, सुसाट वाहने चालविणे, सिग्नलवर वाहतूक कर्मचारी न दिसल्यास नियमभंग करणे, डाव्या बाजूने वाहन चालविणे, अशा कारणांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे.

दंड भरल्याशिवाय सुटका नाहीच
पुणे पोलीस, आरटीओ आणि पासपोर्ट विभाग यांच्याकडे असलेली वाहनचालकांची माहिती एकमेकांना जोडण्यात आला आहे. त्यामुळे नव्याने परवाना काढणे, पासपोर्टला अर्ज करणे, ऑनलाइन दुबार परवाना काढणे ही सर्व कामे वाहतूक पोलिसांच्या परवानगीशिवाय करता येणार नाहीत. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड वसुलीसाठी पुणे पोलिसांकडून आरटीओ आणि पासपोर्ट विभागाची मदत घेतली जात आहे. त्यामुळे दंड भरल्याशिवाय वाहनचालकांची सुटका होणार नाही. तसेच बेफिकीरपणे वागून वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, नाहीतर पोलिसांकडून कारवाईचा वेग तीव्र केला जाईल, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.