राजधानी एक्प्रेसची डबल पॉवर! ‘पुश ऍण्ड पुल’ इंजिनांची करामत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मध्य रेल्वेच्या नाशिकमार्गे सुरू केलेल्या राजधानी एक्प्रेसला लावलेल्या डबल ‘पुश बॅक’ इंजिनामुळे तिच्या वेळेत जवळपास 95 मिनिटांची बचत झाली आहे. त्यामुळे मुंबईतून कामे आटोपून आता पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथून सुटणार्‍या राजधानीप्रमाणे मध्य रेल्वेच्या राजधानीनेही सकाळी दिल्ली गाठणे प्रवाशांना शक्य होणार आहे. ही गाडी सीएसएमटीहून 23 मार्चपासून दुपारी 2.50 ऐवजी सायंकाळी 4.10 वाजता सुरू झाली आहे.

मध्य रेल्वेने प्रथमच राजधानी एक्प्रेस सुरू केली असून ही गाडी महाराष्ट्रातून नाशिक मार्गे राजधानी दिल्लीला सकाळी 10.20 वाजता पोहचते. अलीकडेच तिला पुढे आणि मागे अशी दोन इंजिनांची ताकद जोडल्याने तिच्या वेगात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे तिला आता दु. 2.50ऐवजी सायं. 4.10 वाजतादेखील सोडून ती आता दिल्लीत सकाळी 10.05 वाजता दाखल होणार आहे. यापूर्वी ती स.10.20वाजता पोहचत होती.

राजधानीला पुढे आणि मागे डब्ल्यूएपी – 7 हे इंजीन लावल्याने ही गाडी भोपाळमध्ये पूर्वी मध्यरात्री 2.10 वाजता पोहचत होती. आता नव्या ‘पुश-पुल’ डबल इंजिनाने ती मुंबई ते भोपाळ वेगाने धावणार असून रात्री 10.55 वाजता भोपाळमध्ये दाखल होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

कसारा लोकलची वेळ बदलणार कधी?

राजधानीच्या वेळाबाबत तातडीने निर्णय घेतला जातो. परंतु आम्ही गेले दीड वर्षे पहाटेची पहिली कसारा लोकल 4.25ऐवजी 3.55 किंवा 4.00 वाजता सोडण्याची मागणी करीत आहोत. त्यामुळे कसारा, आसनगाव, वासिंद परिसरातील कर्मचार्‍यांना फर्स्ट शिफ्टसाठी लेटमार्क होणार नसल्याचे कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी सांगितले. या गाडीने जाणारा भाजीपालाही वेळेत पोहचला तर त्याला जादा भाव मिळतो, अशी भाजी विक्रेत्यांची मागणी आहे. त्यामुळे आमच्याही मागण्यांकडे रेल्वेने लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

timetable-train