ऑलिम्पिक पदक विजेती सिंधू लढवणार निवडणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डबल ऑलिम्पिक पदक विजेती हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू 17 डिसेंबरला  स्पेनमध्ये होणाऱ्या जागतिक चॅम्पियनशिपदरम्यान बीडब्ल्यूएफ ऍथलिट आयोगामार्फत घेण्यात येणारी निवडणूक लढणार आहे.

विश्वविजेती सिंधू सध्या बालीमध्ये ‘सुपर 1000’ श्रेणीच्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा खेळत आहे. सिंधू आणि श्रीकांत यांनी इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. बीडब्ल्यूएफ ऍथलिट आयोगाच्या निवडणुकीतील सहा पदांसाठी नामांकन भरणाऱ्या नऊ खेळाडूंपैकी सिंधू ही एक आहे.

पुन्हा निवडणूक लढवणारी सिंधू एकमेव

सिंधू सध्या पुन्हा निवडणुकीला उभी राहणारी एकमेव खेळाडू आहे. तिने यापूर्वी 2017 मध्येही निवडणूक लढली होती. सध्याच्या कार्यकाळामध्ये सिंधू ही सहा महिला प्रतिनिधींपैकी एक होती, असंही आयोगाने स्पष्ट केले आहे. 26 वर्षीय सिंधूबरोबरच इंडोनेशियाची महिला खेळाडू ग्रेसिया पोलीसुद्धा निवडणूक लढणार आहे. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकावर नाव कोरलं आहे. मे महिन्यामध्ये आयओसीने बिलिव्ह इन स्पोर्टस् या मोहिमेसाठीही सिंधूची ऍथलिट आयोगावर निवड केली होती.