
सामना प्रतिनिधी । नांदेड
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देण्यास विरोध करणाऱ्या व यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन मराठवाड्याच्या संतापात भर घालणाऱ्या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची शनिवारी चांगलीच पाचावर धारण बसली. शिवसेनेने काळे झेंडे दाखवून त्यांना नांदेडात मज्जाव करण्याचा इशारा दिल्यानंतर आज छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळा अनावरण समारंभाला त्यांनी येण्याचे टाळले. शिवसेनेच्या इशाऱ्याची दखल घेवून त्यांनी नांदेडचा दौराच रद्द केला.
राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठवाड्याच्या पाण्यासंदर्भात पक्षपाती धोरण स्विकारुन जायकवाडीला देण्यात येणाऱ्या पाण्यास विरोध केल्याने त्यांचा खरा चेहरा समोर आला असून, आज छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळा अनावरण प्रसंगी विखे पाटलांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, आनंदा बोंढारकर, उमेश मुंडे यांनी हा इशारा दिला होता. त्यानुसार आज शिवसेनेने शासकीय विश्रामगृहावर जोरदार तयारीही केली होती. एकीकडे महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते म्हणून मिरवायचे, खरे तर राज्याचा विरोधी पक्षनेता हा कुठल्याही विभागाचा विंâवा एखाद्या जिल्ह्याचा नसतो, त्याने राज्यातील विविध ऐरणीवरचे प्रश्न मांडले पाहिजेत, मात्र काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपला खरा चेहरा समोर आणला आहे. जायकवाडीच्या पाण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना खुद्द राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन मराठवाड्यात पाणी सोडण्यास विरोध दर्शविला. मात्र मराठवाड्याचाच भूमिपुत्र अॅड. सूर्यवंशी यांनी त्यांच्या निष्णात वकिलाला सडेतोड व अभ्यासपूर्ण उत्तर देत मराठवाड्याला न्याय दिला.
एकीकडे काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, जनतेच्या प्रश्नावर, आरक्षणाच्या मुद्यावर व अन्य प्रश्नावर जनसंघर्ष यात्रा काढत असतानाच दुसरीकडे याच पक्षाच्या विरोधी पक्ष नेत्याने आपला खरा चेहरा समोर आणला. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याला विरोध करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार होते. मात्र शिवसेनेने दिलेला इशारा व आंदोलनाची केलेली तयारी लक्षात घेता आज या कार्यक्रमातून राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंग काढून घेतले आणि त्यांचा जाहीर झालेला दौरा अक्षरशः रद्द झाला.
शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला आमचा विरोध नाही, मात्र मराठवाड्याच्या हक्काच्या व न्याय पाण्यासाठी मराठवाडा संघर्ष करत असताना हे पाणी सोडू नये, यासाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या व मराठवाड्याला विरोध करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांना नांदेड शहरात पाय ठेवू दिला जाणार नाही, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद पाटील बोंढारकर, उमेश मुंडे यांनी दिला होता. आज शिवसेनेच्या वतीने शासकीय विश्रामगृहासमोर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. दुपारी साडेबारा ते दिड वाजेपर्यंत शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते याठिकाणी जमा झाले. विखे पाटीलचे झाले काय, खाली मुंडके वरी पाय, विखे पाटील मुर्दाबाद, मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी विरोध करणाऱ्या विखे पाटलांचा निषेध असो, जय भवानी, जय शिवाजी या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

































































