खिसेकापूंपासून सावध राहा, आज ते सीबीएसईच्या आत बसले आहेत! सीबीएसईच्या कारभारावरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-gandhi-warns-govt-opposition-will-defeat-attempts-to-attack-national-unity

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंग आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रियेवरून केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयावर जोरदार निशाणा साधला आहे. सीबीएसईच्या चुकीचा फटका देशातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून, स्वतःच्याच उत्तरपत्रिका योग्यरित्या तपासून घेण्यासाठी त्यांच्याकडून मोठी फी वसूल केली जात असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. ‘खिसेकापूंपासून सावध राहा, आज ते सीबीएसईच्या आत बसले आहेत’, असा टोलाही केंद्र सरकारला लगावला आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये शिक्षण व्यवस्थेच्या व्यापारीकरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, सीबीएसईच्या स्वतःच्या चुकीमुळे जर एखाद्या विद्यार्थ्याला चुकीचे गुण मिळाले, तर काय होते, असा सवाल त्यांनी केला. शुल्काचा तपशील मांडताना त्यांनी सांगितले की, डिजिटल स्कॅन प्रत मिळवण्यासाठी प्रति विषय 100 रुपये, फेरगणनेसाठी प्रति पेपर 100 रुपये आणि पुनर्मूल्यांकनासाठी प्रति प्रश्न 25 रुपये मोजावे लागतात. यामुळे स्वतःचाच पेपर व्यवस्थित तपासून घेण्यासाठी एका विद्यार्थ्याला सुमारे 2000 रुपयांचा खर्च येऊ शकतो. जर जवळपास 4 लाख विद्यार्थी असे अर्ज सादर करत असतील, तर सीबीएसई यातून किती प्रचंड महसूल मिळवत असेल, याची कल्पना करायला हवी, असा दावा त्यांनी केला. मोबाईल फोन वापरून उत्तरपत्रिका स्कॅन केल्या जात असल्याने चुकीची तपासणी होण्याची शक्यता वाढते आणि या चुका दुरुस्त करण्याचा आर्थिक भार विद्यार्थ्यांवर लादला जातो. शिक्षणाला सेवेऐवजी व्यवसायात बदलले की चुका सुधारण्याऐवजी अधिक वाढतात आणि याची सर्वात मोठी किंमत देशातील मुले आपला वेळ, आत्मविश्वास आणि भविष्य गमावून मोजत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

जेव्हा शिक्षणाला सेवा न मानता एक व्यवसाय बनवले जाते, तेव्हा चुका सुधारल्या जात नाहीत, तर त्या आणखी वाढवल्या जातात. आणि याची सर्वात मोठी किंमत आपली मुलं मोजत आहेत—त्यांचा वेळ, त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांचे भविष्य..असे त्यांनी त्यात म्हटले आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी सार्थक सिद्धांत नावाच्या एका सोशल मीडिया वापरकर्त्याची पोस्ट री-शेअर करत या मुद्द्याकडे लक्ष वेधले होते.