राष्ट्रपतींच्या अभिभाषणात महागाई व बेरोजगारी शब्द नव्हते, याला काय म्हणायचे? राहुल गांधी यांचा लोकसभेत सवाल

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी देशहित, ज्वलंत समस्या आणि विकासाबद्दल राष्ट्रपतींच्या अभिभाषणाची परंपरा आहे. मात्र, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणात महागाई आणि बेरोजगारी हे दोन शब्दच नव्हते, याला काय म्हणायचे? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत विचारला आहे. भारत जोडो यात्रेत लोक मला येऊन देशातले प्रश्न सांगत होते. अनेकांनी आम्हाला सांगितले की, बेरोजगारी आणि महागाईच्या समस्येशी आम्ही अक्षरशः झुंज देत आहोत. देशात ही स्थिती असताना राष्ट्रपतींच्या अभिभाषणात बेरोजगारी आणि महागाई हे दोन शब्दही नव्हते, याला काय म्हणावे? देशात परिस्थिती वेगळी आहे आणि अभिभाषण वेगळे असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला भारत जोडो यात्रा काँँग्रेसची यात्रा होती. नंतर ती लोकांची यात्रा झाली. कारण आमच्या यात्रेत सगळेच लोक आल्याने आमच्या यात्रेला कुठलीही बंधने नव्हती. सगळ्या जातीचे, धर्माचे लोक आमच्यासोबत आले. त्यांनी आम्हाला त्यांच्या समस्या सांगितल्या. त्यावरून माझे निरीक्षण हे आहे की, देशात बेरोजगारी आणि महागाई या दोन मोठ्या समस्या आहेत. त्याचा उल्लेखही राष्ट्रपतींच्या अभिभाषणात करण्यात आला नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. अदानींसाठी विमानतळांचा नियम बदलण्यात आला, असे वाक्य राहुल गांधी यांनी उच्चारल्यानंतर लोकसभेत गदारोळ झाला. ‘तुम्ही कुठल्या नियमाविषयी बोलत आहात, त्याचे पुरावे दाखवा, उगाच हवेत आरोप करू नका,’ असे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले. तर किरेन रिजिजू यांनीही राहुल गांधी यांना पुरावे सादर करा, असे आव्हान दिले. त्यावर आम्ही लवकरच पुरावे सादर करू, असेही राहुल गांधी यांनी सांगितले. अदानींना सुरक्षा क्षेत्रातला काहीही अनुभव नव्हता. मात्र, ते ड्रोन्स तयार करतात, जे लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी वापरले जातात. ‘एचएल’च्या माध्यमातून हे काम अदानींना दिले गेले. पंतप्रधान इस्रायलला जातात आणि त्यानंतर अदानींना काम मिळाले. कुठलाही अनुभव नसताना हे काम अदानींना देण्यात आले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.