
मोदी-शहा व भागवतांनी आपल्या देशाची लोकशाही हायजॅक केली आहे, ते आपल्या देशासोबत जे करत आहेत तो देशद्रोह असून यातले कुणीही वाचणार नाही, असा खणखणीत इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांनी भाजपला दिला आहे. आकाशवाणी भवनातून प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढला.
निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आज इंडिया आघाडीच्या खासदारांनी लोकशाही बचाव मोर्चा काढला आहे. हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर पोहचताच पोलिसांनी खासदारांना अडवले आहे. राहुल गांधी व खासदार प्रियांका गांधी यांना पोलिसांनी गेल्या काही तासांपासून आकाशवाणी भवनाच्या परिसरात थांबवून ठेवले आहे.
”इथे काही वेळा पूर्वी तीनशे खासदार आले होते. आम्हा सर्वांना निवडणूक आयोगाचे आयुक्तांना व त्यांच्या दोन सहकाऱ्यांना भेटायचे होते पण पोलिसांनी आम्हाला इथे थांबवले. आम्ही देशाचे प्रतिनिधी आहोत, आम्ही देशाच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करतो. पण माहित नाही का पोलिसांनी आमच्या सर्व खासदारांना इथे थांबवून ठेवले आहे. शंभर मीटरवर निवडणूक आयोगाचे कार्यालय आहे तरिही आम्हाला ज्ञानेश कुमारला भेटू दिले जात नाहीये. माहित नाही देशात काय सुरू आहे? जर खासदारांना निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना भेटू दिले जात नाही तर लोकशाहीचा काय अर्थ आहे? असा संतप्त सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.
”आम्ही फक्त त्यांना रोखायला आलेलो नाही तर आम्हाला त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकायचे आहे. मी देशाच्या लोकशाहीला वाचवायला इथे आलो आहे. माझ्यासोबत इथे देशातील 300 खासदार आले होते, ते देखील देशाच्या लोकशाहीला वाचवायचा प्रयत्न करत आहेत. अमित शहा, नरेंद्र मोदी, मोहन भागवत, ज्ञानेश कुमार यांनी लोकशाहीला संपवून टाकले आहे. ही गोष्ट संपूर्ण देशाला, देशातल्या तरुणांनाही पटलेली आहे. इथले पोलीस देखील हेच बोलत आहेत. आपल्या देशाला नरेंद्र मोदी, मोहन भागवत यांनी हायजॅक केले आहे आणि त्यात ज्ञानेश कुमार यांनी त्यांना मदत केली आहे. यातल्या सर्वच्या सर्व लोकांवर कारवाई होणार. यातली एकही व्यक्ती वाचणार नाही. जे काही आपल्या देशासोबत यांनी केलंय तो देशद्रोह आहे आणि यातला कुणीही वाचणार नाही”, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.



























































