मिरजेत बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्यावर छापा; बनावट नोटांसह 4 लाखांचा ऐवज जप्त

बनावट नोटा छापणाऱ्या मिरज येथील कारखान्यावर सांगली शहर पोलिसांनी छापा घातला. आरोपी अहद शेख याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एक लाख 90 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटांसह 3 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी अहद शेख याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

सांगली-कोल्हापूर रोडवर बनावट नोटांची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून आरोपी अहद शेख याला ताब्यात घेतले. त्यानंतर बनावट नोटा छापणाऱ्या मिरजेतील कारखान्यावर छापा घालण्यात आला. 50 रुपये चलनाच्या बनावट नोटा, प्रिंटर, स्कॅनर, कागद, शाई, क्रीन प्रिंटिंग, डाय, कटर, हेअर ड्रायर आणि लॅमिनेटर असा 3 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सांगली शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सागर घोडे, पोलीस निरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, सचिन शिंदे, मच्छिंद्र बर्डे, संदीप पाटील, विनायक शिंदे, मुलाणी, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, योगेश सटाले, सुमीत सूर्यवंशी, पृथ्वीराज कोळी, तपस्या खोत आणि कॅप्टन गुंडवाडे यांनी सदर कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे सांगली जिह्यात खळबळ उडाली आहे.