
तुर्भे एमआयडीसीतील इंदिरानगर परिसरात सुरू असलेल्या गांजा विक्रीच्या अड्ड्यावर अमली पदार्थविरोधी पथकाने छापा टाकत तडीपार आरोपी राहुल दांडे यांच्या पत्नीसह पाचजणांना अटक केली. या कारवाईत एक किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे सव्वा लाख रुपये आहे.
इंदिरानगर परिसरात गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अमली पदार्थविरोधी पथकाने परिसरात सापळा रचून कारवाई केली. छाप्यामध्ये दीपिका दांडे हिच्यासह आणखी चारजणांना ताब्यात घेण्यात आले. दीपिका ही तडीपार आरोपी राहुल दांडे याची पत्नी आहे. हा अड्डा राहुल दांडे हाच चालवत असल्याचे तपासात उघड झाले आहे. सध्या तो फरार असून तुर्भे पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.




























































