
रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱया फुकटय़ा प्रवाशांना पश्चिम रेल्वेने 2022-23 या आर्थिक वर्षात दंडाचा जबरदस्त दणका दिला आहे. त्यामध्ये चार तिकीट तपासनीसांनी (टीसी) उत्कृष्ट कामगिरी करत रेल्वेला कोटय़वधी रुपये दंडाच्या माध्यमातून मिळवून दिले आहेत. त्याची दखल घेत रेल्वेने संबंधित चार टीसींचा गौरव केला आहे.
रेल्वेच्या लोकलबरोबरच मेल-एक्प्रेस गाडय़ांनी अनेकजण विनातिकीट प्रवास करतात. त्यांना चाप लावण्यासाठी रेल्वेकडून तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. त्यांमध्ये राजकोट विभागाचे उपमुख्य तिकीट निरीक्षक के.के. डी. ओझा यांच्यासह अहमदाबाद विभागाचे वरिष्ठ तिकीट परीक्षक अजमेर सिंग, उपमुख्य तिकीट निरीक्षक शैल तिवारी आणि चर्चगेटच्या फ्लाइंग स्क्वॉडचे मुख्य तिकीट निरीक्षक गीताबेन वसावा यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्याची दखल घेत पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गौरव केला आहे. तिकीट तपासनीसांना तिकीट नसलेले प्रवासी शोधण्यासाठी केवळ कौशल्य आणि चातुर्य असून चालत नाही, तर तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी नियमांचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.
























































