पावसाची विश्रांती, पावसाळी आजारही आले आटोक्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना पूर्ण नियंत्रणात आल्यानंतर पावसाळी आजारही आटोक्यात आले आहेत. पावसाने विश्रांती घेतल्याने पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे पावसाळी आजारही नियंत्रणात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या आठवडाभरात मलेरियाचे रुग्ण निम्म्याने घटले असून डेंग्यू, स्वाइन फ्लू, गॅस्ट्रोही नियंत्रणात आल्याने मुंबईसाठी समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईत 27 सप्टेंबरपर्यंत आठवडाभरात मलेरियाचे 172, डेंग्यूचे 41 आणि गॅस्ट्रोचे तब्बल 88 रुग्ण आढळले आहेत. मात्र गेल्या आठवडय़ात मलेरियाचे 89, डेंग्यूचे 35, गॅस्ट्रोचे 13 रुग्ण आढळले आहेत. तर चिकनगुनियाचा एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान, पावसाळी आजारांमुळे ऑगस्टपर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लेप्टो-मलेरियामुळे प्रत्येकी एक आणि डेंग्यू-स्वाइन प्लूमुळे प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाळी आजार आटोक्यात आले तरी मुंबईकरांनी काळजी घ्यावी, रस्त्यावर विकले जाणारे उघडय़ावरील पदार्थ खाऊ नयेत, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

आठवडाभराची रुग्णसंख्या
मलेरिया – 659
लेप्टो – 47
डेंग्यू – 215
गॅस्ट्रो – 371
कावीळ – 69
चिकनगुनीया – 0
स्वाइन फ्लू – 14

अशी घ्या काळजी

ताप, कफ, घशात इन्फेक्शन, शरीर जखडणे, डोकेदुखी, अतिसार, उलटी अशी लक्षणे आढळल्यास वाढणारा प्रसार रोखण्यासाठी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
शिंकताना, खोकताना नाकावर रुमाल पकडावा, वेळोवेळी हात साबण पाण्याने स्वच्छ धुवावेत, डोळे-कान-तोंडाला वारंवार स्पर्श करू नये, गर्दी टाळावी.