वसुंधरा राजे यांनी दिले राजकारण सोडण्याचे संकेत, म्हणाल्या….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानमध्ये निवडणुकांची धामधुम सुरु असताना माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंच्या एका वक्तव्याने राजकिय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यांनी एका रॅलीमध्ये त्यांच्या मुलाचे बोलणे ऐकल्यानंतर मला आता राजकारणातून निवृत्ती घ्यायला हवी असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे वसुंधरा राजे निवृत्त होणार की, मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी भक्कम करण्यासाठी भावनिक कार्ड खेळत आहेत अशा चर्चांना उधाण आले आहे.

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार मोठ्या गाजावाज करत केला जात आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याकडे मुख्यमंत्री चेहरा म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान वसुंधरा राजे यांनी शुक्रवारी अचानक झालावाडमध्ये राजकारण सोडणार असल्याचे संकेत देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. येथे त्यांचा मुलगा दुष्यंत सिंह याचे भाषण ऐकल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, माझ्या मुलाचे बोलणे ऐकल्यानंतर मला राजकारणातून निवृत्ती घ्यायला हवी असे वाटते. त्या पुढे म्हणाल्या, तुम्ही सर्वांनी त्याला एवढे तयार केले की, मला त्याला पुढे करण्याची गरजच लागणार नाही. सर्व आमदार येथे आहेत आणि मला वाटतं की, त्याच्यावर नजर ठेवण्याची गरजही लागणार नाही. कारण तो स्वबळावर लोकांसाठी काम करेल असे म्हणाल्या.

राजस्थानमध्ये 200 सदस्यीय विधानसभा निवडणुकीसाठी 25 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शनिवारी झालावाड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी शुक्रवारी त्यांनी पक्षाच्या मेळाव्याला संबोधित केले. येथे राजे यांचे पुत्र आणि झालावाड-बारण लोकसभा मतदारसंघाचे खासदार दुष्यंत सिंह हेही रॅलीत सहभागी होण्यासाठी पोहोचल्या. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

राजस्थानमध्ये भाजपने यावेळी आपल्या मुख्यमंत्र्याचा चेहरा जाहीर केलेला नाही. त्यामुळे मागच्या काही महिन्यांपासून भाजपच्या निवडणुका जिंकण्याबाबत वसुंधरा राजे यांच्या भूमिकेबाबत वेगवेगळे निष्कर्ष लावले जात आहेत. वसुंधरा राजे पाच वेळा खासदार आणि चार वेळा आमदार राहिल्या आहेत.