राजावाडी रुग्णालयात ‘सीटीस्कॅन, एमआरआय’ बंद, शिव आरोग्य सेनेची रुग्णालयावर धडक

घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात सध्या ‘एमआरआय’, ‘सीटीस्कॅन’ बंद असून  ‘आयसीयू’मध्ये बेडची कमतरता आहे. त्यामुळे या ठिकाणी येणारे रुग्ण, गरोदर स्त्रीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याची गंभीर दखल घेत शिव आरोग्य सेनेने रुग्णालयावर धडक देत तातडीने गैरसोयी दूर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.

शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून राज्यभरात गोरगरीबांना अहोरात्र आरोग्य विषयक मदत केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील गैरसोयी दूर करण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाकडे करण्यात आली. शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा डॉ. शुभा राऊळ, कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या सुचनेनुसार आज महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ यांनी शिष्टमंडळासह रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. भारती राजुलवाला व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पैयनवार यांची भेट घेत रुग्णालयातील गैरसोयी दूर करण्याची मागणी केली. यावेळी संघटनेचे मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक अमोल वंजारे, मुंबई जिल्हा समन्वय सचिव ज्योती भोसले, मुंबई पूर्व उपनगर सहसमन्वयक प्रकाश वाणी, ईशान्य मुंबई अध्यक्ष (डॉक्टर सेल) डॉ. शारिवा रणदिवे, समन्वय सचिव शिवाजी झोरे, विनायक कानसकर, मयूर वाटाबळे, प्रवीण ढवळे, हितेश गायकवाड, किशोर भिलारे, लितेश केरकर, सचिन भांगे, चंद्रकांत हळदणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

अशा आहेत समस्या

रुग्णालयात सीटी स्कॅन, एम.आर.आय मशीन उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना शताब्दी किंवा शिव रुग्णालयात टेस्टसाठी जावे लागते. आयसीयू विभाग चालू केला आहे, परंतु त्या विभागात बेडची कमतरता आहे. अपघात विभागाकडे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शौचालय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न व्हावा जेणेकरून राजावाडी परिसरात अस्वच्छता होणार नाही. इमर्जन्सी वॉर्डमध्ये आय.सी.यू.ची गरज आहे.