राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यामुळे हृदयशस्त्रक्रिया झालेली चिमुकली मुंबईहून जयसिंगपूरला पोहोचली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण राज्‍यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यामुळे हृदयशस्त्रक्रिया झालेली जयसिंगपूर येथील दहा महिन्याची रुहानीका माळी ही बालिका मुंबईहून जयसिंगपूरला सुखरूप घरी पोहोचली आहे. मुंबई येथील रिलायन्स’च्या कोकिळाबेन रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रीया झाली होती.

जयसिंगपूर लक्ष्मी मंदिर शाहूनगर येथे रहात असलेल्या रोहन जयराज माळी यांची दहा महिन्याची मुलगी रुहानीका माळी हिच्यावर मुंबई येथील कोकिलाबेन हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. तिच्या हृदयाला छिद्र असल्यामुळे नुकतीच तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली, काही दिवस तिला रुग्णालयात ठेवून घेतले. नुकताच तिला डिस्चार्ज मिळाला आणि दरम्यान कोरोनाच्या वातावरणामुळे महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाऊन झाला होता. संचारबंदी लागू झाली आणि सर्व प्रकारची वाहने व रस्ते बंद झाले. दवाखान्यात माळी यांना काही कळेनासे झाले.डिस्चार्ज घेऊन जायचं कुठं, मुंबईत कोणी नातेवाईक नाहीत, अथवा राहायची कोणतीही सोय नाही, आर्थिक प्रश्न सुद्धा मोठा होता. अशा काळात गावी जयसिंगपूरला येण्याखेरीज कोणताच पर्याय नव्हता.

माळी यांनी नगरसेवक असलम फरास यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांच्यामार्फत सारी हकीकत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या कानावर घातली. यानंतर मंत्री यड्रावकर यांनी तातडीने हालचाली करत मुंबईमधील आपल्या स्टाफला संबंधित मुलीला त्यांच्या पालकांसह जयसिंगपूर मध्ये पोहोचविण्याचे आदेश दिले आणि अवघ्या दहा महिन्याची रुहानीका माळी आपल्या पालकांसह कोणताही खर्च न करता जयसिंगपूर मधल्या आपल्या घरी सुखरूप दाखल झाली.

मंत्री महोदयांना फोनवरून फरास यांनी ही आनंदाची बातमी सांगितली आणि केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावर मंत्री यड्रावकर यांनी संबंधित मुलीची काळजी घेणे बाबत सांगितले व रूहानीका हिला दीर्घायुष्य लाभावे अशा शुभेच्छा दिल्या.