
राजस्थानमधील जलोर जिल्ह्यात एका सरकारी शाळेत प्रशिक्षणादरम्यान नागिन डान्स करणे तीन शिक्षकांना महागात पडले आहे. या तिघांना कामावरून निलंबित करण्यात आले आहे.
ही घटना दहा दिवसांपूर्वी घडली असून या शिक्षकांवर बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात एका महिला शिक्षिकेचाही समावेश आहे.
त्यांच्या नागिन डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रशिक्षणासाठी आलेल्या इतर शिक्षकांचे हे तिघेजण मनोरंजन करत होते. त्यावेळी काहीजणांनी त्यांच्या डान्सचा व्हिडीओ काढला व सोशल मीडीयावर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये एका महिला शिक्षिकेसह दोन शिक्षक नागिणच्या संगितावर ताल घेत नाचत असल्याचे दिसत आहे.
याप्रकरणी जलोर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी अशोक रोशेवाल यांनी संगितले की या तिघा शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. यातील दोन शिक्षकांची नवीन नियुक्ती झाली होती. त्यांच्या या डान्समुळे कोणालाही इजा झालेली नाही. पण त्यांनी आचारसंहीतेचा भंग केला असल्याचे रोशेवाल यांनी सांगितले.



























































