
सामना प्रतिनिधी । डहाणू
महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱयांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी गुजरातमधील अमूलने मंगळवारी एक्सप्रेसला स्पेशल वॅगन जोडून दीड लाख लिटर दूध पाठवल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी स्वतः थेट महाराष्ट्र-गुजरात सीमेवर कार्यकर्त्यांसह जाऊन नाकाबंदी केली. शेट्टी यांचा धसका घेत अमूलने रेल्वेने दूध पाठवण्याचा निर्णय रद्द केला. तसेच गुजरातमधून मुंबई, ठाण्याकडे येणारे टँकरही माघारी वळवले. त्यामुळे आज गुजरातमधून मुंबईला येणारी दुधाची रसद संपूर्णपणे तुटली.
खासदार राजू शेट्टी मंगळवारी सायंकाळीच डहाणूत डेरेदाखल झाले. महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर असलेल्या दापचरी-आच्छाड येथील तपासणी नाक्यावर गुजरातहून येणारे दूध टँकर अडवण्यासाठी राजू शेट्टी कार्यकर्त्यांसह तळ ठोकून बसले. राजू शेट्टी रात्रभर डोळ्यांत तेल घालून पहारा देत होते. हे वृत्त कळताच गुजरातमधून येणारे दुधाचे टँकर महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आधीच थांबवण्यात आले. दुपारनंतर ते पुन्हा गुजरातकडे वळवण्यात आले. गुजरातमधून अमूलचे १० लाख लिटर दूध अहमदाबाद एक्सप्रेसने मुंबईत आणले जाईल, असे ट्विट पश्चिम रेल्वेने केले होते. त्यामुळे ही रेल्वे डहाणूमध्ये अडवण्याचा निर्धारही शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे या एक्सप्रेसला सहा वॅगन जोडून त्यातून दूध पाठवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने रद्द केला. तरीही शेट्टी यांनी सकाळी ही एक्सप्रेस डहाणू स्थानकावर रोखून धरली. या एक्सप्रेसला दुधाची कोणतीही वॅगन जोडलेली नाही याची खात्री पटल्यानंतरच शेट्टी यांनी आंदोलन थांबवले. नंतरच ही एक्सप्रेस मुंबईला रवाना झाली.
बोईसरला वसुधाराच्या गेटवर ठिय्या
त्यानंतर राजू शेट्टी आणि कार्यकर्ते बोईसर येथील अमूलच्या वसुधारा डेअरीत दाखल झाले. त्यांनी वसुधाराच्या प्रवेशद्वारावर ठिय्या दिला. महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱयांचे आंदोलन सुरू असेपर्यंत गुजरातवरून दुधाचे टँकर वसुधारा डेअरीत आणू नयेत, असा इशारा दिला. तसेच दिवसभर या डेअरीबाहेर खडा पहारा दिला. त्यामुळे आज वसुधाराचा कारभार संपूर्णपणे थंड पडला होता.
आजपासून रस्त्यावर गुरे-ढोरे सोडून नाकाबंदी
उद्यापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातील रस्त्यावर गुरे-ढोरे सोडून नाकाबंदी केली जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ते म्हणाले, परराज्यातून दुधाचे टँकर आणून महाराष्ट्रातील शेतकऱयांचे आंदोलन चिरडण्याचा सरकारचा डाव आहे. सरकार शेतकऱयांवर दडपशाही करत आहे. त्यामुळे आता शेतकऱयांची बायकापोरेही या आंदोलनात उतरतील.
पुण्यात दूधटंचाई; चितळे डेअरीची दूध विक्री बंद
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘दूध बंद’ आंदोलनाचे परिणाम आता चांगलेच जाणवू लागले असून शहरात दुधाची टंचाई जाणवू लागली आहे. बुधवारपर्यंत आंदोलकांना चुकवत आलेल्या टँकरमुळे आणि शिल्लक साठय़ातून पुणेकरांना काही का होईना दूध मिळत होते, मात्र चितळे डेअरीचे संकलन बंद असल्यामुळे गुरुवारी चितळे डेअरीकडून दूध विक्री बंद ठेवली आहे. त्याबरोबर इतर दूध संघांचा पुरवठाही घटला आहे. त्यामुळे आज पुणेकरांना दुधासाठी वणवण भटकण्याची वेळ येणार आहे. परिणामी पुणे शहराला सुमारे पंचवीस ते तीस टक्के दूधपुरवठा करणाऱया चितळे डेअरीने दूध विक्री बंद ठेवली आहे तर कात्रज दूध संघाचे संकलन निम्म्यावर आले असून पुरवठाही घटला आहे.
























































