राज्यसभेचा सामना बरोबरीत! महाविकास आघाडी तीन आणि भाजपने तीन जागा जिंकल्या, शिवसेनेच्या संजय राऊत यांचा खणखणीत चौकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत  शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल, काँग्रेसचे  इम्रान प्रतापगढी हे महाविकास आघाडीचे तीन उमेदवार तर भाजपचे पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक विजयी झाले तर शिवसेनेचे संजय पवार यांना पराभव पत्करावा लागला. भाजपच्या आक्षेपामुळे मतमोजणी वेळेवर सुरू होऊ शकली नाही. तब्बल साडेआठ तासांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मतमोजणी सुरू झाली. पहाटे तीनच्या नंतर या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. शिवसेनेचे संजय राऊत सलग चौथ्यांदा राज्यसभेवर निवडून आले आहेत.

फडणवीसांनी विविध मार्गांनी माणसे आपलीशी केली; शरद पवार यांचा उपरोधिक टोला

या निवडणुकीत एक मान्य केले पाहिजे की, देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गांनी माणसे आपलीशी करण्यात यश आले आहे, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यसभा निवडणुकीच्या मतदानात भाजपने रात्री घेतलेली हरकत हा रडीचा डाव होता. राज्यसभेच्या निर्मितीच्या नियमानुसार मतदाराने पक्षाच्या नेतृत्वाला मत दाखवायचे असते. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी नाना पटोले व जयंत पाटील यांना मत दाखवले. यामध्ये काही बेकायदेशीर नव्हते, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज पुण्यात व्यक्त केले.

प्रफुल पटेलांचे जादा मत कुठून आले?

मला धक्का बसेल असा हा निकाल नाही. प्रत्येक उमेदवाराच्या मतांची संख्या बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या कोटय़ामध्ये काही फरक पडलेला नाही, पण एक मत प्रफुल पटेल यांना जादा पडले आहे आणि ते कुठून आले आहे ते मला ठाऊक आहे. ते महाविकास आघाडीचे नाही, असे शरद पवार म्हणाले.

एका निकालाने सगळं संपले असे होत नाही

हार-जीत होतच असते. पण ती कायम नसते. एका निकालाने सर्व काही संपले असे होत नाही. आमचे नेतृत्व गेली पंचावन्न वर्षे देशाच्या राजकारणात आहे. त्यातील 50 टक्के वर्षे त्यांची सत्तेत गेली, तर पन्नास टक्के वर्षे विरोधात गेली, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.  ज्या वेळी आमचे सरकार आले, त्या वेळी ज्यांनी महा विकास आघाडीला पाठिंबा दिला. महाविकास आघाडीच्या दोन आमदारांना मतदान करता आले नाही. तसेच एक मत बाद झाले. याचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसला. या सगळ्याचे सविस्तर विश्लेषण आम्हाला करावे लागेल असे त्या म्हणाल्या.

कांदे यांचे मत बाद ठरवले; कोर्टात जाणार

भाजपच्या तक्रारीमुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले. या निकालाच्या विरोधात कांदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

संजय पवारांचा दुसऱया फेरीत निसटता पराभव

पहिल्या फेरीत शिवसेनेचे संजय पवार यांना 33 मते तर भाजपच्या धनंजय महाडिक यांना 27 मते मिळाली. दुसऱया फेरीत गोयल व बोंडे यांची सर्व मते महाडिक यांना मिळाल्याने संजय पवारांचा निसटता पराभव झाला.

महाविकास आघाडीची मते कायम

या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांची सर्वच्या सर्व मते कायम राहिली. मात्र अपक्ष व लहान पक्षांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आश्वासन देऊन महाविकास आघाडीला मतदान केले नाही. त्यामुळे शिवसेनेचे संजय पवार यांना पराभव पत्करावा लागला.

उमेदवार          मते

  • संजय राऊत (शिवसेना)    41
  • प्रफुल पटेल (राष्ट्रवादी काँग्रेस) 43
  • इम्रान प्रतापगढी (काँग्रेस) 44
  • पीयूय गोयल (भाजप)       48
  • अनिल बोंडे (भाजप) 48
  • धनंजय महाडिक (भाजप) 41
  • संजय पवार (शिवसेना)     39

प्रफुल पटेल यांना एक मत अधिक

या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादीने 42 मतांचा कोटा आपल्या उमेदवाराला निश्चित केला होता. शिवसेनेचे सुहास कांदे यांचे एक मत बाद झाल्याने शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांचे एक मत कमी झाले. त्यामुळे त्यांना 41 मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल यांना त्यांच्या कोटय़ापेक्षा एक मत अधिक पडले. त्यामुळे त्यांच्या पारडय़ात 43 मते पडली.

काही अपक्षांनी छोटय़ा–मोठय़ा कारणांनी महाविकास आघाडीला मतदान केले नाही, तर काहींची वैयक्तिक नाराजी असू शकते. त्याच्या खोलात जावे लागेल.
–
प्रफुल पटेल, राष्ट्रवादी

सरकार असताना आम्ही 170 ऐवजी 180 ची बेरीज करायला पाहिजे होती. त्यात आम्ही निश्चित कमी पडलो आहोत. आता एकोप्याने पुढे जावे लागेल.
– छगन भुजबळ, राष्ट्रवादी

 आतापर्यंत निधी देताना अपक्षांना झुकते माप देण्यात येत होते. पण यापुढे विचार करावा लागेल.
– विजय वडेट्टीवार, काँग्रेस