
सामना प्रतिनिधी । लातूर
जिल्हयात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम. 27 नोव्हेंबर पासून राबविली जात असून याअंतर्गत 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना गोवर-रुबेला लस देण्यात येणार आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व नागरिक, पालक-बालक यांच्यात जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा क्रिडा संकूल ते शिवाजी चौक व शिवाजी चौक ते क्रीडा संकूल पालक- बालक एम.आर.थॉन रॅलीस जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. या रॅलीत लातूरकरांनी उर्त्स्फूतपणे सहभाग नोंदवून मोठा प्रतिसाद दिला.
या पालक-बालक एम.आर.थॉन रॅलीत महापौर सुरेश पवार, जि.प.चे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, पोलीस अधिक्षक राजेंद्र माने, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिकेचे आयुक्त कौस्तूभ दिवेगावकर, कार्यकारी अभियंता श्री. थोरात ,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी रॅलीत सहभागी झालेल्या पालक-बालकांचे अभिनंदन करुन या रॅलीचा उद्देश समजावून सांगून सर्वांनी आपापल्या बालकांना गोवर-रुबेला लस घेण्याचे आवाहन केले. या मोहिमेत जिल्ह्यातील 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील सुमारे 9 लाख बालकांना गोवर रुबेलाबाबत लसीकरण करण्यात येणार आहे.
या गोवर-रुबेला एम.आर.थॉन रॅलीस जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, उपप्रादेशिक कार्यालय, जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी, रोटरी क्लब व लॉयन्स क्लबचे पदाधिकारी व नागरिक, बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























































