
देशभरात गाजलेल्या अयोध्या राम मंदिर प्रकरणावर नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निकाल सुनावला. राम मंदिराच्या या संपूर्ण घटनाक्रमावर चित्रपट येणार असल्याचं वृत्त असून पुढील वर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाचं नाव अपराजित अयोध्या असं असणार आहे. या चित्रपटाची कथा के. व्ही. विजेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. विजेंद्र प्रसाद यांनी बाहुबली या चित्रपट मालिकेचं लेखन केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री कंगना रणौत करणार आहे. कंगनाने अभिनयासह मणिकर्णिका या चित्रपटातून दिग्दर्शनाची धुराही सांभाळली होती. आता ती निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे.
या चित्रपटाची कथा एका नास्तिक तरुणाची असून त्याच्या आस्तिकतेपर्यंतचा प्रवास या चित्रपटात रेखाटला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक असून अनेक वर्षं चाललेला वाद त्यामुळे समाप्त झाला आहे. मीही लहानपणापासून अयोध्येविषयी ऐकत आले आहे. त्यामुळे मी या कथानकावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला, असं मनोगत कंगनाने व्यक्त केलं आहे.
























































