
सामना ऑनलाईन । मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर राम मंदिर निर्माणाच्या मागणीने जोर धरला आहे. तसेच विविध राजकीय पक्षही मंदिराच्या मागणीसाठी आग्रही आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आता अयोध्येत जाण्याची घोषणा केली आहे. मी सुद्धा अयोध्येला जाणार आहे. तेथे राम मंदिर आणि बुद्ध मंदिरासाठी जागा द्यावी, अशी मागणी करणार आहे, असे आठवले यांनी सांगितले.
अयोध्यात राम मंदिर व्हावे या मताचा मी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निकाल राममंदिराच्या बाजूनेच लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अयोध्येतील जागा बुद्ध मंदिराची होती. त्यामुळे तेथे राममंदिरासह बुद्ध मंदिरालाही जागा मिळावी असेही ते म्हणाले. अयोध्येत राम मंदिरासाठी मुस्लिमही सहकार्य करत आहेत. त्यामुळे सहमतीने हा प्रश्न सुटला पाहिजे, असेही ते म्हणाले.



























































