रानसई धरण ओव्हर फ्लो

38


सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

रानसई धरण क्षेत्रात गेल्या तिन-चार दिवसांत चांगला पाऊस झाल्यामुळे हे धरण ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील पीण्याच्या पाण्याचे संकट दुर झाले आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून रानसई धरण क्षेत्रात जवळ-जवळ 800 मी.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला असल्यामुळे हे धरण आत्ता पूर्ण क्षमतेने भरले आहे. सोमवार 08 रोजी दुपारी हे धरण ओसंडून वाहण्यास सुरूवात झाली. सध्या या धरणाची पाण्याची पातळी ११६.५ फूटाच्या वरती आहे, अशी माहिती एम्आयडीसी उरण कार्यालयाचे उपअभियंता आर.डी. बिरंजे यांनी दिली.

गेल्या वर्षी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हे धऱण 06 जलैलाच ओसंडून वाहू लागले होते. यावर्षी पावसाळ्याचा जून महिना कोरडा ठाक गेल्यामुळे हे धरण अद्याप पर्यंत भरले नव्हते. त्यामुळे उरण तालुक्याला बारवी धरणातून पाणी पुरवठा करावा लागला होता. रानसई धरणाची उंची १२० फूट जरी असली तरी धरणाची पाण्याची पातळी ११६.६ फूट एवढी झाली की हे धरण ओव्हर फ्लो होते. अर्ध्या अधिक उरण तालुक्याची तहान रानसई धरण भागवते. रानसई धरणातून सध्या उरण नगरपरिषद, २१ गावे आणि एनएडी, ओएनजीसी, जीटीपीएस् या प्रकल्पांना पाणी पुरवठा केला जातो. यंदा मार्च अखेरीस या धरणाच्या पाण्याने तळ गाठला होता. कधी नव्हे तो मृत साठ्यातून पाणी उपसावे लागले होते. त्यामुळे एमआयडीसीने तीन दिवसाची पाणी कपात सुरू केली होती. आत्ता धरण भरल्यामुळे उरणच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून लवकरच उरणकरांची पाणी कपात बंद करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीच्या सूत्रांनी दिली.

निसर्गाच्या कुशीत डोंगर दऱ्यांमध्ये हे रानसई धरण आहे. पावसाळ्यात अनेक पर्यटक या धरणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणि या धरणावरून पडणाऱ्या पाण्याच्या धारा अंगावर झेलण्यासाठी येत असतात. मात्र स हे धरण भरले नसल्यामुळे येथे पर्यटकांनी पाठ फिरवली होती. आत्ता हे धरण भरून ओसंडून वाहत असल्यामुळे नागरींकामध्ये आणि पर्यटकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या