
सजीव सृष्टीमध्ये मनुष्य हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. त्यातही मनुष्य स्वभाव हा दयाभावना व माणुसकीच्या गुणासाठी ओळखला जातो. मनुष्याच्या याच गुणाचा प्रत्यय आज चंद्रपूर जिल्हा कारागृह परिसरात आला.
चंद्रपूर कारागृहातील अधीक्षक निवासस्थान परिसरातील एका झाडाला एक दुर्मिळ होत चाललेले व जखमी झालेले घुबड पतंगाच्या मांज्यामध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले. घुबडाच्या एका पंखाला मांज्यामुळे गंभीर दुखापत झाल्याने ते उडू शकत नव्हते. झाडावर लटकलेल्या घुबडाकडे लक्ष ठेवून झाडाखाली भटके कुत्रे भुंकत होते.
तेवढ्यातच हे दृश्य कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांना दिसले व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता कारागृहाचे शिपाई श्रीधर येरमे यांच्या साहाय्याने घुबडाला मांज्यातून सोडवले आणि त्याला पाणी पाजले. तसंच त्याच्या पंखावरील जखमेवर औषध लावले व त्याला निवासस्थान परिसरातील पेरुच्या झाडावर ठेवले.
गंभीर दुपाखतीमुळे व पंखाभोवती मांजा गुंडाळल्याने ते उडू शकत नव्हते. त्यामुळे आगे यांनी ताबडतोबत स्थानिक प्यार फाऊंडेशनच्या पक्षीमित्रांच्या बचाव पथकाशी संपर्क करुन घुबडाला सुखरुप त्यांच्या ताब्यात दिले. या घुबडाला योग्य उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात सोडावे अशी पक्षीमित्रांना विनंती केली.
यावेळी प्रतिक्रिया देताना कारागृह अधीक्षक वैभव आगे म्हणाले की, चंद्रपूर जिल्हा पशुपक्ष्यांच्या अधिवासासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात जगभरातून पर्यटक येथील जंगलात पशुपक्ष्यांचा मुक्त संचार बघण्यासाठी येत असतात. परंतु नायलॉन मांज्याच्या वापरामुळे या पशुपक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे, ही आपल्यासाठी निश्चितच अभिमानास्पद बाब नाही, असे आगे यावेळी म्हणाले.
View this post on Instagram
























































