रत्नागिरी – हॉटेल आणि उपाहारगृहांना रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हॉटेल आणि उपाहारगृह सुरु ठेवण्याची रात्री 10 वाजेपर्यंत मुदत होती. आज जिल्हाधिकाऱ्यांनी नवा आदेश जाहीर करत हॉटेल आणि उपहारगृहांना 50 टक्के आसनक्षमतेसह रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध जाहीर केले होते. त्यामध्ये हॉटेल आणि उपाहारगृह रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनेक हॉटेल व्यावसायिकांवर पोलीसांनी कारवाई केली. त्यानंतर हॉटेल असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांनीच भेट घेऊन त्यांना निवेदन देत हॉटेल रात्री 11 वाजण्याच्या पुढे चालू ठेवण्याची परवानगी मागितली होती. हॉटेलमध्ये रात्री 9 वाजता गिऱ्हाईक यायला सुरुवात होते. पण 10 वाजता हॉटेल बंद करण्याची वेळ असल्याने हॉटेलचालकांची धावपळ होते. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांनी रात्रीची वेळ वाढवून मागितली होती. त्या मागणीनुसार जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आज नवा आदेश जाहीर केला आहे. त्यामध्ये 50 टक्के आसनक्षमतेत रात्री 12 वाजेपर्यंत हॉटेल सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची अभ्यागताची संख्या याची माहिती देणारा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. घरपोच सेवा देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.