
रत्नागिरी जिल्ह्यातील माचाळ गावच्या विकासाची आता सुरुवात झाली आहे. माचाळ गावात तीन वर्षांपूर्वी मी आलो होतो तेव्हा अतिशय बिकट अवस्था होती. आज परिस्थिती सुधारली असली तरी रस्त्याचे डांबरीकरण, गावात पाणी पुरवठाही सुरू करायचा आहे.
माचाळ येथे अन्य पायाभूत सुविधांचा विकास करत असताना स्थानिक भूमीपुत्रांना घेऊन माचाळ पर्यटनाचा आराखडा करण्यात येईल असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले. विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने 70 वर्षानंतर माचाळ गावात रस्ता झाला. रस्ता झाल्याने ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांचे गावात जंगी स्वागत करत त्यांचा सत्कार केला.
हिलस्टेशन म्हणून परिचित असलेले माचाळ गाव स्वातंत्र्यापासूनच विकासापासून वंचित होते.गावात जाण्यासाठी रस्ताही नव्हता. दऱ्याखोऱ्यातील वाटा तुडवत गावात जावे लागत होते.माणूस आजारी पडला तर डोलीतून दवाखान्यात आणावं लागायचं. गावच्या प्रतिकूल परिस्थितीची कथा ग्रामस्थांनी तीन वर्षापूर्वी खासदार विनायक राऊत यांच्याकडे मांडली. त्यावेळी खासदार विनायक राऊत यांनी तात्काळ माचाळला भेट दिली. त्यानंतर पुन्हा सर्व अधिकाऱ्यांचा ताफा घेऊन ते माचाळ गावात आले होते. माचाळ गावातील संघर्षमय जनजीवनाची जाणीव प्रशासनाला करून दिल्यानंतर माचाळच्या विकासाला चालना मिळाली.
पर्यटन विकासाच्या माध्यमातून माचाळ मधील दऱ्याखोऱ्यातून जाणाऱ्या तीन किमीच्या रस्त्याला विनायक राऊत यांनी निधी मिळवून दिला. त्यामुळे आज माचाळ गावात रस्ता झाला. हे काम पाहण्यासाठी विनायक राऊत यांनी गावात भेट दिली. त्यावेळी माचाळवासियांनी त्यांचे वाजत गाजत स्वागत केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, उद्योजक रवींद्र सामंत, किरण सामंत, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, माजी जि.प.अध्यक्ष रोहन बने, विवेक सावंत, सभापती जया माने उपस्थित होते. यावेळी खासदार राऊत यांनी अधिकरी वर्गाने माचाळमध्ये केलेल्या कामाचे कौतुक केले. हा रस्ता करणे खूप कठीण होते. आम्ही फक्त निधी आणला मात्र प्रत्यक्षात अण्णा सामंत यांचा अनुभव आणि साहस यामुळेच हा रस्ता पूर्ण झाल्याचे गौरवोद्गार राऊत यांनी काढले.



























































