
सामना प्रतिनिधी । मुंबई
साहित्य अकादमीच्या पुरस्कारावर माझी पहिली प्रतिक्रिया आनंदाची आहे. पण पुरस्कार उशिरा मिळाला याची खंत आहेच. माझी सर्व बालनाटय़े ४० ते ४५ वर्षांपूर्वीची आहेत. त्यांची आता दखल घेतली जाते. बालसाहित्य हा प्रकार तसा दुर्मिळ साहित्यप्रकार आहे. त्यामुळे खरं तर अशा प्रकाराची वेळीच दखल घेतली गेली पाहिजे अशा भावना रत्नाकर मतकरी यांनी व्यक्त केल्या. तसेच या वेगाने माझ्या समग्र साहित्य जीवनाची दखल घेतली जाणार असेल तर पुढील शे- दीडशे वर्षे लागतील असा टोलाही त्यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना लगावला.
पुरस्काराच्या निमित्ताने बालसाहित्याकडे लक्ष वेधले जातेय हेही नसे थोडके असे मतकरी म्हणाले. अलबत्या गलबत्या हे नव्या स्वरूपात रंगभूमीवर आलेले नाटक आहे. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. अवघ्या महिनाभरात या बालनाटय़ाचे ५० च्यावर प्रयोग झाले आहेत ही गोष्ट खरंच विलक्षण आहे. पण त्याची दखल कुणी घेत नाही याकडे मतकरींनी लक्ष वेधले. पॉप्युलर प्रकाशनने ‘अलबत्या गलबत्या’ची नवीन आवृत्ती बाजारात आणली आहे हे सारे उमेद वाढवणारे आहे, असे मतकरी म्हणाले.
बालसाहित्य मुळात मुलांपर्यंत पोचले पाहिजे. मुलांच्या पुस्तकांमध्ये चांगली चित्रं, चांगले साहित्य पाहिजे. काही जण तसे काम करत आहेत हे कौतुकास्पद आहे. अनेकदा मासिकातून खूप चांगल्या गोष्टी येतात. त्यांचे पुस्तक येणे गरजेचे असते. पण कुणी लक्ष देत नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
























































