INDvENG रवि शास्त्रींनी मौन सोडलं, विराटसेनेचं कौतुक करत टिकाकारांना दिलं उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात होणारा पाचवा कसोटी सामना कोविड-19 च्या वाढत्या धोक्यामुळे रद्द करण्यात आला. हा कसोटी सामना रद्द झाल्यापासून टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री टिकाकाराच्या निशाण्यावर आहेत. रवि शास्त्री हे एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेले आणि तिथूनच टीम इंडियाच्या गोटात कोरोना घेऊन आले असा आरोप होत आहे.

एक सप्टेंबर रोजी रवि शास्त्री एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेले होते. या कार्यक्रमानंतर रवि शास्त्री यांच्यासह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर आणि फिजियोथेरेपिस्ट डॉक्टर नितिन पटेल यांनाही कोरोनाची लागण झाली होती. यानंतर पाचवी कसोटी रद्द करावी लागली होती. शास्त्रींमुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप टिकाकारांनी केला होता. आता या आरोपांना रवि शास्त्री यांनी पहिल्यांदाच उत्तर दिले आहे.

इंग्रजी वृत्तपत्र ‘मिड डे’शी बोलताना शास्त्री म्हणाले की, संपूर्ण यूनायटेड किंगडम सुरू आहे आणि येथे कोणालाही कुठे जाण्यास प्रतिबंध नाही. तसेच आपल्यावर झालेल्या आरोपांवर बोलताना शास्त्री म्हणाले की, संपूर्ण देश खुला असल्याने पहिल्या कसोटीपूर्वी देखील काहीही होऊ शकले असते.

विराटसेनेचे केले कौतुक

इंग्लंडमध्ये विराट कोहलीच्या संघाने केलेल्या कामगिरीचे रवि शास्त्री यांनी कौतुक केले. इंग्लंडच्या प्रेक्षकांना खूप दिवसांनी एवढे चांगले क्रिकेट पाहायला मिळाले असेल आणि ते पण हिंदुस्थानी संघाकडून. हा कोरोनाचा काळ असला तरी खूपच चांगला खेळ रंगला. टेम्स नदीच्या दोन्ही बाजूला (नदीच्या एका बाजूला लॉर्डसचे मैदान तर दुसऱ्या बाजूला ओव्हलचे मैदान आहे) हिंदुस्थानी संघाने दमदार खेळ केला.