
सामना प्रतिनिधी । धुळे
विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघात २५ जून रोजी, मतदान सकाळी ७ ते ५ या वेळेत होणार आहे. निर्धारीत वेळेनंतर मतदान केंद्रावर कुणी आल्यास मतदानास स्पष्ट नकार द्यावा. तसेच मतदान केंद्रावर ओळख पटविल्याशिवाय मतदानाचा अधिकार बजावण्याची संधी देऊ नये. मतदान करणाऱयाच्या डाव्या हाताच्या अंगठय़ावर शाई लावावी अशा सूचना विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी धुळय़ात केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया राबविणाऱया यंत्रणेला विभागीय आयुक्तांनी मार्गदर्शन केले.
विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी २५ जूनला मतदान होणार आहे. सध्या उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून प्रचार होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी निवडणूक प्रक्रिया राबविणाऱया यंत्रणेची बैठक झाली. या बैठकीला विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी मार्गदर्शन केले. या वेळी विभागीय आयुक्त माने म्हणाले, सकाळी ७ ते ५ अशी मतदानाची वेळ आहे. या वेळे व्यतिरिक्त कुणालाही मतदान करू देऊ नये. तसेच मतदान करू इच्छिणाऱया व्यक्तीचे छायांकित ओळखपत्र घेऊन त्याची खात्री करावी. त्यानंतरच त्याला मतदानास परवानगी द्यावी. मतदान करणाऱयाच्या डाव्या हाताच्या अंगठय़ावर शाई लावावी. जेणे करून एक व्यक्ती पुन्हा मतदान करणार नाही. यानंतर २१ जूनला प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.

































































