
पापडीतलाव, कोळीवाडा येथे राहणाऱ्या सहा आदिवासी महिलांना चोरीच्या संशयावरून पोलिसांनी मारहाण केल्याचा प्रकार घडल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी महिलांना झोडपणारे पोलीस निरीक्षक विनोद वाघ यांची पोलीस उपायुक्त कार्यालयात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, या महिलांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचेही निष्पन्न झाले असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. शुक्रवारी पापडी येथील बाजारपेठेत चोरी झाल्याची तक्रार काही नागरिकांनी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर संशयावरून सहा आदिवासी महिलांना ताब्यात घेतले. त्यांची पोलीस चौकीत आणून चौकशी करण्यात आली. नंतर सोडून दिले असले तरी चौकशी दरम्यान पोलिसाने बेदम मारहाण केली असल्याचा आरोप सदर महिलांनी केला आहे. या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले. मारहाण करणाऱ्या पोलिसावर कठोर कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.
























































