
कोई क्या रोकेगा हमे… हमने भारत जोडने की ठानी है!
पाच डिग्री तापमान आणि त्यातच कोसळणारा पाऊस. रेनकोट घातल्याशिवाय पर्याय नाही असे वातावरण. पण अशा वातावरणातही काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला जम्मूत तुफान प्रतिसाद मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत हे आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. राहुल यांच्यासोबत राऊत यांनी तब्बल 12 किलोमीटरपर्यंत पदयात्रा केली.
संजय राऊत यांनी गुरुवारी जम्मू येथे कश्मिरी हिंदू पंडितांच्या धरणे आंदोलनात सहभागी होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला. त्यानंतर आज ते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाले. यात्रेत चालत असतानाच दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही रंगली होती. या दोन नेत्यांचा फोटो ‘भारत जोडो’ ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. ‘कोई क्या रोकेगा हमें हमने भारत जोड़ने की ठानी है’ अशी कॅचलाइन या फोटोला देण्यात आली आहे.
यात्रेनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले, ‘राहुल गांधींना माझ्याबद्दल चिंता होती. मला अटक का केली हे त्यांना माहिती होते. कोणत्या कारणासाठी माझा आणि माझ्या कुटुंबाचा छळ सुरू आहे हे त्यांना माहिती होते. मी वाकत नाही, झुकत नाही. ‘डरो मत’ हा राहुल गांधी आणि माझा सामाईक मंत्र आहे. तेही डरो मत म्हणतात आणि मीही म्हणतो घाबरू नका. हे आमचे मैत्रीचे नाते आहे.’
कश्मीरातही ‘पन्नास खोके…एकदम ओक्के’ घोषणा
संजय राऊत यात्रेत पोहचले तेव्हा ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद’ अशा घोषणा घुमल्या. शिवसेनेचे प्रदेश प्रमुख मनीष साहनी यांच्यासह शेकडो शिवसैनिक यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ अशी घोषणाही दिली गेली. त्यावर, बघा महाराष्ट्रातील घोषणा येथे दिली जातेय, असे राहुल हे राऊत यांना म्हणाले.
संजय राऊत हे यात्रेत सहभागी होताच राहुल गांधी यांनी त्यांची गळाभेट घेत स्वागत केले. संजयजी… मी तुम्हाला फार मानतो, असे राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर चर्चा रंगली. काहीही झाले तरी वाकायचे नाही, झुकायचे नाही. हुकूमशाहीसमोर मरण पत्करू असा आमचा मंत्र आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. दोन्ही नेत्यांमध्ये यात्रेदरम्यान विविध राजकीय घडामोडींवर चर्चा झाली.




























































