परीक्षण – निसर्ग अन् अध्यात्माची सांगड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> साबीर सोलापुरी 

सोलापूरचे ज्येष्ठ कवी सूर्यकांत घिवारे यांचा पहिलावहिला ‘मृदगंध’ हा काव्यसंग्रह निसर्गाचा अंगभूत टवटवीतपणा लेवून साकार झालाय. कवीचा पिंड अध्यात्माबरोबरच शेतशिवाराच्या मातीत रमणारा, ओल्या आभाळाच्या हाकेला ‘ओ’ देणारा, मृदगंधाने धुंद करणारा आहे.

सकारात्मक कविता ही लोकांमध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते, जी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची प्रेरणा देत असते. कवितेतून लोकांना जगण्याची प्रेरणा प्राप्त होणं हीच तर कवितेची सार्थकता असते. माणूस ओंजळीत जीवनाचं दान घेऊन जन्माला येतो तेव्हा त्याचं जगणंच असह्य करून टाकणारे काही कटू अनुभवही येत असतात, मात्र मनावरची काजळी झटकून आनंदाची रांगोळी काढता आली की, कविता निखळ मृदगंधाची होऊन जाते.

लोटोनिया दूर मनाची काजळी
काढावी रांगोळी अंगणात ।।

आपल्या पुढय़ात येणाऱया प्रत्येकालाच हा गंध मुक्तहस्तानं वाटणं हाच ‘मृदगंध’ या काव्यसंग्रहाचा स्थायिभाव आहे. मातीवर पाय रोवून असणाऱया मनाची गाथा म्हणजे कवी सूर्यकांत घिवारे यांचा ‘मृदगंध’ हा काव्यसंग्रह होय.

रानामधुनी श्रम पेरू
घामाने भिजवू रानमळे
फुटुनी कोंब फुलता शेती
होईल ग्रीष्म ऊनकोवळे

अशा प्रकारच्या दमदार ओळींतून कवी सूर्यकांत घिवारे यांच्या कवितेचा कस लागतो. माती, शेतीविषयीची ही ज्वारीच्या भरदार कणसासारखी जाणीव गावगाडय़ातील व्यवहाराच्या कंगाल शिवाराला समृद्ध करणारी आहे. अवघ्या जीवनाचं गाणं करणारी आहे.

सरता भोग उजडेल भाग्य जीवनी फुलेल रम्य चांदणे
येता लक्ष्मी सोनपावली आनंदे गाऊ जीवनगाणे

जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणारे अभंग मायमराठीत अनेक संतांनी शेकडो वर्षांपूर्वीच सकळ जनांपुढं आणून ठेवले आहेत. याला कवी सूर्यकांत घिवारेदेखील अपवाद नाहीत. त्यांनी अनेकविध अभंग रचले आहेत. अभंग म्हणजे केवळ अध्यात्म नव्हे, त्याला सामाजिक आशयाची डूब असते. घिवारे यांचे अनेक अभंग हृदयस्पर्शी आहेत. त्यात जीवाशिवाची व्यापकता सामावलेली आहे. खालील अभंग वाचताना त्यात वाचक खचितच गुंतत जातो.

गुंतता गुंतता असे गुंते जीव
सदैव मी शिव पहा असे ।।

अभंग म्हटलं की, दीनांचा सोयरा विठूरायाचं नामस्मरण करणं अगदी क्रमप्राप्त ठरतं. हा कवी जसा निसर्गात रममाण होणारा असला, अभंगातून अध्यात्मात तल्लीन होणारा असला तरी त्याची सामाजिक जाणीवही तितकीच प्रखर, प्रबळ आहे.
काळ कितीही समृद्धीचा आला तरी श्रमिकांचं शोषण काही केल्याविना नाही थांबत. जीवापाड कष्ट उपसूनही श्रमिकाला सुखाचे दोन घास खायला मिळतीलच असं नाही. अशा ‘नाही र’s वर्गाच्या बाजूनं कवी उभा राहतो. श्रमिक कवीला भाऊ वाटतात. व्यवस्था तर पूर्णतः बधिर झालीय. दोष द्यायचा तर कुणाला? असा प्रश्न कवीसमोर उभा ठाकतो.

कष्टकऱ्यांचे जिणे आमुचे
श्रमिक आमुचे असती भाऊ
दोष कुणाला देऊ कशाला?
राबू, कांडू तेव्हा खाऊ

नातेसंबंधावरही कवीचं परखड भाष्य येतं. वास्तविक, नाती ही जगण्याचा आधार असतात. नात्यांमुळं जगणं सुकर होत जातं. जी नाती स्वार्थापलीकडंची असतात ती कायम टिकून राहतात, परंतु काही नाती स्वार्थ घेऊनच जन्माला येतात. ती संधिसाधू असतात. ती कृत्रिम, तकलादू ठरतात. सागरासारखं कुणापाशी तरी मन रितं करावं असा अंतरीचा सोयरा कुठंच नाही भेटत. हे सांगण्यासाठी कवी लिहून जातो.

आपुले सोयरे आहेत फितूर
लुटण्या अधीर संधीसाधू

दैनंदिन समाज जीवनातील दांभिकतेवर, भ्रष्टाचारावर, अनाचारावर, वैगुण्यावर लाभो सुखशांती या अभंगातून निर्भीडपणे कोरडे ओढले आहेत.

तुझ्या डाळिंबी ओठात निरागस नयनात
बालछबी तरळते मन माझे मोहरते

संपूर्ण लावणीच्या अंगानं जाणारी ही ठसकेबाज रचना आहे. ‘करुणा झरा’ या शीर्षकाची रचना गझलेच्या वळणानं जाणारी वाटत असली तरी ती तांत्रिकदृष्टय़ा सदोष आहे. त्याकरिता नियमावलीतील बारकाव्यांसह गझलेचं तंत्र अवगत करून घेणं आवश्यक आहे. घिवारे यांनी मानवी जीवनाचं मर्म साध्यासोप्या, सरळ शब्दांतून सांगितलंय. यात शब्दांचं संमोहन नाही. मोठमोठय़ा उपमा, प्रतिमा, रूपकं यांची लयलूट नाही. इथं साजिऱ्यागोजिऱ्या आलंकारिक शब्दांची उसनवारी नाही. जे आतून जाणवलं, भावलं त्या सच्च्या अनुभूतीच्या या कविता आहेत.

‘मृदगंध’ (काव्यसंग्रह)
कवी : सूर्यकांत घिवारे
प्रकाशक : शिवप्रज्ञा प्रकाशन, सोलापूर
पृष्ठ : 80, मूल्य : रुपये 120/-