माणसांमधील वेगळे पंथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. विजया वाड

कविता महाजनांच्या धारदार, बंडखोर लेखणीतून व्यक्त होणारी ‘भिन्न’ पंथीयांची असह्य व्यथा.

‘ब्र’ही कादंबरी लिहून साहित्य जगतात खळबळ उडविणाऱ्या लेखिका कविता महाजन यांचे ‘भिन्न’ हे पुस्तकही अतिशय वेगळय़ा धाटणीचे, धीट, स्पष्ट विचारांचे आणि अंतस्थ करुणेची किनार असलेले आहे. वरून नाक, कान, डोळे, शरीर सारखंच असतं हो माणसाचं, पण तरीही ती भिन्न असतात अन् काही माणसे तर अशा अवघड जागेच्या दुखण्याने त्रस्त असतात की, सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी अवस्था होते. माणसं अगदी सहजतेने अशा माणसांना वेगळं टाकतात. जात-धर्म-रंगभेद, आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद, निरोगी आणि विशिष्ट रोगांनी पीडित असणाऱ्यांतले भेद, कितीतरी तऱहा! डोकं भिन्न करणाऱ्या! पण एका क्षणी अशा लोकांचं वेगळेपणच त्यांची शक्ती, ऊर्जा, चेतना बनतं. त्यांच्या प्रत्येक तुकडय़ात जीव ओतून त्यांना एकसंध बनवतं.

कधी कधी जीवनात निराशेचा अंधकार माजतो. इतकी निराशा की, जगणेच निरर्थक वाटू लागते, पण पाठोपाठ वाटू लागते, ‘‘अरे जगणे जसे निरर्थक तसे मरणेही निरर्थकच की!’’ मग आत्मघाताचा विचार बाजूला सारला जातो नि जगण्याला सामोरं जाण्यासाठी जीवन सिद्ध होतं. सज्ज होते. प्रत्येक क्षण सामोरा येणारा, अर्थपूर्ण जगावा ही इच्छा मनात दाटते, जगावं असं वाटतं. नुसतं जगावं नव्हे, तर चांगलं जगावं असं वाटतं. लेखिका म्हणते, ‘‘तेव्हा मात्र या शकलित बुद्धीच्या माणसांपेक्षा ही माणसे मग सर्वार्थाने भिन्न बनतात.’’

राजहंस प्रकाशन, पुणे यांनी मोठ्या जबाबदारीने प्रकाशित केलेले हे पुस्तक.

लेस्बियन माणसं, एड्सपीडित माणसं, अनैसर्गिक संभोग करणारी माणसं यांना आपण आपल्यात घेत नाही.

कोण ‘आपले’ कोणी ‘परके’

बहिष्कृततेचे विचारच पक्के

व्याख्या ‘आपल्या’ ‘टाकलेल्यां’च्या

कोणी ठरविल्या सीमारेषा भेदांच्या?

लेखिका या भेदाभेदांबद्दल लिहिताना फार ‘स्पष्ट’ होतेयसं वाटतं. आपल्याला स्त्री-पुरुष यांच्यात येणारे संबंध तेवढे सभ्य वाटतात. समलैंगिकता वा अन्य तऱहा असभ्य वाटतात. ‘तू जन्मतः हिजडा जन्मलास’ हे असभ्य कसे? हा दैवदुर्विलास आहे असे आपण मानतो? किती जण मानातात हो? यात आपली नायिका एक ‘डिबेटचा’ मुद्दा स्पष्टपणे न संकोचता मांडते. आपला मामेभाऊ राजेश दोन लेस्बियन मुलींचे चाळे बघून हबकलाय. त्याला म्हणते, ‘‘या सगळया ‘असभ्य’ वाटणाऱ्या गोष्टी वगळून तू समाजाचा विचार करतो आहेस म्हणून तुला असं वाटतंय. तेही याच समाजात आहेत. समाजाचा एक हिस्सा आहेत अशा नजरेने बघ नं! समाज म्हणजे कोण हे आधी ठरव. मग समाजस्वास्थ्य म्हणजे काय याचा विचार कर. आपली नजर थोडी व्यापक बनली पाहिजे राजा. तिच्यात सगळय़ांचा समावेश केला पाहिजे. समाजस्वास्थ्याची संकल्पना ही मानवी समाजाला पुढे नेणारी असली पाहिजे. तुझ्या-माझ्यासारखीच ही माणसं शिकूसवरू शकतात, कामधाम करू शकतात. तेही विचार करतात. त्यांनाही भावना आहेत. फक्त त्यांची लैंगिकता वेगळी आहे, म्हणून आपण त्यांना वगळायचं का? का, तर आपण केवळ संख्येने जास्त आहोत म्हणून? उद्या समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांची संख्या विभिन्न लिंगी संबंध ठेवणाऱ्यांपेक्षा वाढली तर त्यांनी म्हणायचं का, की तुम्ही अनैसर्गिक वागता आणि आमच्याच तऱहेचे संबंध नैसर्गिक आहेत म्हणून?’’ किती विचार करायला लावणारा मुद्दा आहे.

कादंबरीची नायिका एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे हे कळल्यावर तिच्या मनात दाटलेला कोलाहल अत्यंत परिणामकारक चितारला आहे. ती लिहिते, ‘‘सोसायटीत थोडीशी कुजबूज सुरू होतीच. मग माझ्या आजारी पडण्यानं त्याचं कोलाहलात रूपांतर झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी मोलकरीण आलीच नाही. विचारायला गेल्यावर म्हणाली, ‘तुमच्याकडचं काम केल्यावर मला पण रोग लागेल म्हणतात लोक.’ तिला समजावूनही काही उपयोग नव्हता. ‘तुमच्यात काम क्येलं तर आमच्यात येऊ नुको आसं म्हनत्यात लोक. तुमच्याच बिल्डिंगीतली! आता या एका कामापायी बाकी धा कामं मी कशी सोडू?’ तिचं बोलणं तिच्यापरी रास्तच होतं. पण आता धुणी, भांडी, केर, लाद्या… सारी कामं घरी करणं आलं.’ नायिकेला वाटतं, आपल्या वाट्याला हा दुर्धर रोग आला खरा, पण त्याचा त्रास आपली लेकरं जितू नि अस्मिता का बरं भोगत आहेत? लेकीच्या तोंडी असलेलं एक वक्तव्य विचार करायला लावणारं आहे. बाजारात सगळ्या वस्तू पैसे टाकल्याबरोबर सहज मिळतात तेव्हा हे लोक विचार करीत नाहीत की, एड्सवाल्याला या वस्तू कशा विकू? सारा व्यवहार पैशांभोवती फिरतो.

कहाणीचा शेवट अनपेक्षित आहे. मोहकसोबतचे मोहाचे क्षण उपभोगताना तिच्या मनात विचार येतात. काय होत असेल कुठल्याही लग्नाचं? माणसं चांगल्या तऱहेनं आणि सहज तडजोडी करू शकली तर ते सुसह्य होतही असेल. नसेल सुसह्य तरी अनेक लोक लग्न टिकल्याचं, टिकवल्याचं नाटक करतात. तसंच करायचं आपणही. तेही नाही जमलं किंवा कंटाळवाणंच झालं तर घ्यायचा घटस्फोट. होऊन होऊन काय वेगळं होणार याहून?

कविता महाजन यांची लेखणी खूप खरं, सांसारिक सत्य चितारून जाते. समाजातल्या  ‘भिन्न’ लोकांबद्दल लिहिताना त्या लेखणीला धार चढते. प्रसंगी ती बोल्ड होते, पण जे सांगायचंय त्याला माणुसकीचा वास आहे. ‘भिन्न’बद्दलचा कळवळा आहे. तो काही अंशी जरी आपल्या मनात निर्माण झाला तरी या पुस्तकाच्या वाचनाचे सार्थक होईल. समारोपाचे परिशिष्ट इतके परिणामकारक आहे की, सारं जग सुसह्य वाटावं नि आवडावं. सगळय़ात सामावून मस्त मोकळं नि खरं जगावं. वाचा जरूर… ‘भिन्न’.

भिन्न

  • लेखिका : कविता महाजन
  • प्रकाशक  : राजहंस प्रकाशन, पुणे
  • पृष्ठs : 432.