सीएएविरोधात हिंसाचार घडवणार्या समाजकंटकांची लखनौमध्ये पोस्टर्स लावण्याच्या प्रकाराची अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत रविवारी सुनावणी पूर्ण केली. हिंसाचार करणार्यांची पोस्टर्स कोणत्या नियमाखाली लावलीत, असा सवालही न्यायालयाने सुनावणीवेळी उपस्थित केला. याप्रकरणी न्यायालय सोमवारी निकाल देणार आहे.
लखनौमध्ये डिसेंबरमध्ये सीएएविरोधात हिंसाचार उसळला होता. त्यावेळी आंदोलकांनी सरकारी कार्यालयांचे नुकसान केले होते. हिंसाचार घडवणार्यांची ओळख पटवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आंदोलकांची जागोजागी पोस्टर्स लावली. याप्रकरणी रविवारी अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने सरकारच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्य न्यायमूर्ती गोविंद माथुर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सरकारला नोटीस बजावली. तसेच लखनौ पोलिस आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांनाही न्यायालयाने फैलावर घेतले.
प्रियंका गांधीनीही केली टीका
न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकारचे अधिकारी स्वतःला संविधानापेक्षा श्रेष्ठ समजू लागले आहेत, असा आरोप प्रियंका गांधी यांनी रविवारी ट्विटरवरून केला.
























































